पुणे: गेली आठवडाभर ओढ देणारा पाऊस(Rain) कालपासून पर्यटननगरी लोणावळ्यात बरसू लागला आहे. त्यानंतर वर्षाविहारासाठी शहर परिसरात असलेले धबधबे आणि लोणावळा परिसरात पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. यामुळे विक एंडला या भागात मोठ्या पर्यटक येत आहेत. पाऊस आणि निसर्ग याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी भुशी धरणावर(Bhushi Dam) मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. मात्र डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या या निसर्गाशी आपण खेळायला गेलो तर तो आपल्या जीवाशी खेळतो. याचा धडा हे दोन आठवड्यापूर्वी वाहून गेलेल्या अन्सारी-सय्यद कुटुंबियांच्या घटनेतून पर्यटकांनी घेतलेला आहे. याची जाणीव ठेवत पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटक खबरदारी घेताना दिसत आहेत.


लोणावळ्यात(Lonavala) दोन कुटुंब वाहून गेल्यानंतर प्रशासनाने कठोर पावलं उचलली. पण,प्रत्यक्षात प्रशासनाची कृती मात्र शून्य आहे. विक एंडला गर्दी होणार याची कल्पना असताना ही पोलीस आणि प्रशासनाचा एक ही कर्मचारी पर्यटनस्थळी दिसत नसल्याचं चित्र आहे. प्रशासनाला आणखी एका दुर्घटनेनंतर जाग येणार का? असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. 


दोन आठवड्यांपुर्वी पुण्याजवळ असणाऱ्या लोणावळ्यामध्ये भुशी धरणाच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर मोठी दुर्घटना घडली होती. धबधब्यावर एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली होती. त्यानंतर या परिसरात पर्यटकांसाठी काही कडक निर्बंध लादण्यात आले होते. त्याचबरोबर या परिसरात काही सूचना फलक आणि सुरक्षित अंतर राखून पाण्याचा आणि निसर्गाचा आंनद घ्यावा अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर या भागात संध्याकाळी 6 नंतर पर्यटकांसाठी संचारबंदी घालण्यात आली होती. 


भुशी धरणाच्या परिसरात घडलेल्या त्या दुर्घटनेनंतर संध्याकाळी सहानंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आला होता. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पर्यटकांना आणि कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ही कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचं पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी जाहीर केलं होतं. मात्र, सध्या या परिसरात प्रशासनाची कृती मात्र शून्य दिसून येत आहे.


लोणावळ्यातील पर्यटनासाठी जाहीर केली होती विशेष नियमावली (Lonavala Guideline)


 
लोणावळ्यातील पर्यटनासाठी विशेष नियमावली जाहीर करणार आली होती. लोणावळा, खंडाळा परिसरातील  निसर्गसौंदर्य हे पावसळ्यात  पर्यटकांना भुरळ पडत आहे. त्यामुळे विकेंडच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. पुणे-मुंबईसह लगतच्या भागातून नागरिक या ठिकाणच्या विविध पॉईंटवर गर्दी करत आहेत. मात्र, पर्यटकांनी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी नेमून दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर काही परिसरांमध्ये, धरण क्षेत्रामध्ये, धबधब्यांवरती पर्यटकांना जाण्यासाठी बंदी घालण्यात आली होती.