पुणे : सहकार मंत्री दिलीप (Dilip Walse Patil) वळसे पाटील यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे. दिवाळीनिमित्त ही भेट घेत असल्याची माहिती आहे. मात्र, याच भेटीदरम्यान दोघांमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे. रयत शिक्षण संस्थेबाबत बैठक होण्याची शक्यता आहे.  राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच वळसे पाटील हे शरद पवारांना भेटायला गेले आहे. या भेटी दरम्यान दोघांमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा होणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला. सध्या विद्यमान सरकारमध्ये ते सहकार मंत्री आहेत. शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून त्यांनी राजकारणात ओळख आहे. शरद पवारांचे खंदे शिलेदार अजित पवार गटात गेल्यानं चर्चांना उधाण आलं होतं. मात्र राष्ट्रवादीतील फुट पडल्यानंतर ही पहिलीच दिवाळी आहे. त्यामुळं वळसे पाटील हे दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मोदीबागेत गेल्याची माहिती आहे. 


शरद पवार हे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहे. वळसे पाटील हे रयत शिक्षण संस्थेचे सदस्य आहेत आणि शरद पवारांसोबतच शरद पवारांच्या कार्यालयात रयत शिक्षण संस्थेचे इतर सदस्यदेखील उपस्थित आहे. त्यामुळे वळसे पाटील भेटणार असल्याने शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेची बैठक बोलवल्याची चर्चा आहे. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. 


दिवाळीच्या शुभेच्छा की अन्य काही...


दिवाळीचा सण राजकीय नेत्यांसाठी खास आणि हेवेजावे विसरुन भेटीगाठींचा असतो. त्यामुळे वळसे पाटील अजित पवार गटात जरी सामील झाले असले तरीही दरवर्षी प्रमाणे वळसे पाटील शरद पवारांना भेटायला गेले आहे. दिलीप वळसे पाटलांची राजकीय कारकीर्दच शरद पवारापासून झाली आहे. दिलीप वळसे पाटील हे काही वर्ष शरद पवारांचे स्वीय सहाय्यक होते. त्यानंतर शरद पवारांनी वळसे पाटलांना आमदारकीची संधी दिली. त्यानंतर राज्याच्या मंत्रीमंडळामध्ये सलग कार्यरत आहे.  मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी शरद पवारांना पाठिंबा न देता अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं. त्यानंतर वळसे पाटलांच्या मतदार संघामध्ये त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, असं काही निवडणुकींमधूनही दिसून आलं. त्या पार्श्वभूमीवरुनदेखील या भेटीकडे पाहिलं जात आहे. या भेटीत कोणतंही राजकारण नसल्याची प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. मात्र तरीही या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.