मुंबई : पुण्यातील मोहसीन शेख या आयटी अभियंता तरुणाच्या निर्घृण हत्येप्रकरणातला आरोपी हिंदू राष्ट्रसेनेचा अध्यक्ष धनंजय देसाईला जामीन मिळालाय. पन्नास हजारांच्या जातमुचलक्यावर न्यायमूर्ती साधना जाधव यांनी धनंजय देसाईची जामिनावर सुटका केली आहे.


सोशल नेटवर्किंग साईटवरील काही आक्षेपार्ह पोस्टमुळे  पुण्यात 2014 साली तणाव निर्माण झालेला होता. त्याच वातावरणात 2 जून 2014 साली आयटी क्षेत्रातील मोहसीनची हत्या करण्यात आली. मोहसीनची हत्या पोस्ट टाकल्यामुळे झाल्याचा संशयही पसरवण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी हिंदू राष्ट्रसेनेच्या धनंजय देसाईसह 23 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी आपल्याला जामीन मिळावा यासाठी देसाईने मुंबई उच्च न्यायालयात अॅड. अभिजीत देसाई यांच्यामार्फत जामीन अर्ज केला होता.
मोहसीन शेख हा तरुण आयटी अभियंता मूळचा सोलापूरचा होता. तो पुण्यात कामासाठी स्थायिक झाला होता. मात्र त्याची विनाकारण हत्या करण्यात आल्यानं त्यांच्या कुटुंबीयांचीही स्वप्न त्याच्याबरोबरच संपली. न्याय मिळावा यासाठी त्याचे कुटुंबीय आणि मित्र सामाजिक कार्यकर्त्यांसह गेली साडेचार वर्ष संघर्ष करत आहेत.