पिंपरी : मुख्यमंत्री पदी 'पुन्हा येईन' चा देवेंद्र फडणवीस यांचा नारा फोल ठरला. पण आता जनतेचा आशीर्वाद सोबत असल्यास 'आपण येतोच' असा नारा त्यांनी दिला आहे. पुण्याच्या आळंदीत जोग महाराजांच्या स्मृती सोहळ्यात ते बोलत होते. राजकारणात कमी जास्त होत असत. सत्तेतले विरोधात अन विरोधातले सत्तेत येत राहतात. पण आपण सत्तेत असो की विरोधात सन्मार्ग मात्र सोडू नये. याच सन्मार्गावर चालायचं असेल तर आपल्याला टॉनिक लागतं. ते टॉनिक अर्थात आशीर्वाद घ्यायला इथे आलोय. जनतेचा हा आशीर्वाद सोबत असला की 'आपण येतोच, येतोच आणि येतोच' असा नवा नारा फडणवीसांनी दिला.


आळंदी येथील जोग महाराज स्मृती सोहळ्यानंतर ते म्हणाले की, मी तीन वर्षांपूर्वी या सोहळ्यासाठी आलो होतो, पुढच्या वर्षीही मी पुन्हा येईन. ते म्हणाले, अनेकदा आपण संकुचित विचारांच्या गोष्टी करतो, मात्र संतांनी कधीच असा संकुचित विचार केला नाही. अलीकडच्या काळात सेक्युलर हा शब्द अधिक वापरला जातोय. या शब्दाचा अर्थ काय यावर अनेक वाद होतात. पण याचा खरा अर्थ आणि व्यापक विचार हा वारकरी संप्रदायाचे आहेत. त्यांच्या यायला कोणतीही अट नाही. म्हणूनच प्रत्येक वर्षी लाखो वारकऱ्यांचे पाय पंढरीच्या दिशेने वळतात, असं फडणवीस म्हणाले.

फडणवीस पुढे म्हणाले की, अजून माझ्या हातून सत कार्य न झाल्याने मी सत्कार स्वीकारत नाही. जे कामं आणि निर्णय घेतले ते कर्तव्य होतं. त्यामुळे आज सत्कार घेण्यासाठी नव्हे तर आशीर्वाद घेण्यासाठी आलोय. ते म्हणाले की, राजकारणात कमी जास्त होत असत. सत्तेतले विरोधात अन विरोधातले सत्तेत जात असतात. पण आपण सन्मार्ग सोडू नये आणि या सन्मार्गावर चालण्यासाठी टॉनिक लागतं. ते घ्यायला इथे आलोय. तो आशीर्वाद घ्यायला आलोय, हा आशीर्वाद सोबत असला की आपण येतोच, येतोच आणि येतोच, असं ते म्हणाले.

काल शरद पवार यांनी देखील याठिकाणी आले होते. 'पवार हिंदूविरोधी आहेत. त्यांना वारकऱ्यांच्या कुठल्याही कार्यक्रमात बोलावू नका', असं पत्रक राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वक्ते महाराज यांनी काढलं होतं. त्यावर विठ्ठलाच्या दर्शनाला, माऊलींच्या दर्शनाला किंवा तुकोबारायांच्या दर्शनाला आपल्याला कुणाच्या परवानगीची गरज नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या आरोपाला चोख प्रत्युत्तर दिलं होतं.