Devendra Fadanvis Pune: पुण्यात कोयता गॅंगने (Koyta Gang) धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कोयता गॅंग ठेचून काढायला हवी. त्यांच्याविरोधात काही दिवसातच वेगळ्या पद्धतीने कारवाई होताना पाहायला मिळेल. दहशत ही पोलिसांचीच असायला हवी, असं परखड मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी व्यक्त केलं आहे. शहरातील गुन्हेगारीचं प्रमाण कमी करण्यासाठी योग्य उपाययोजना करणार असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं आहे. 


पुणे विमानतळ हे पुरंदरलाच होणार 


पुणे विमानतळ हे पुरंदरलाच होणार यासाठी संपूर्ण परवानग्या घेतल्या होत्या. मात्र या आधीच्या सरकारने ते विमानतळ वीस किलोमीटर पुढं नेलं. त्या मागे चांगला हेतू असू ही शकतो. मात्र तिथं परवानग्या नाकारल्या गेल्या. पुण्यापासून 50 किमीवर विमानतळ करण्याला काही अर्थ नव्हता. कारण नवी मुंबईत ही विमानतळ आहे. अशा परिस्थितीत आधी ज्या जमिनीला सर्व परवानग्या मिळाल्या आहेत, तिथंच विमानतळ होणार आहे. आत्ताच्या विमानतळावर पोहचता पोहचता डोकेदुखी होते त्यासारखं या नव्या विमानतळावर पोहचताना डोकेदुखी होणार नाही. त्यामुळे पुणे विमानतळ हे पुरंदरला होणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


नवी महापालिका निर्माण करुन प्रश्न सुटणार नाहीत...


पुण्यात केवळ नवी महापालिका निर्माण करून प्रश्न सुटणार नाहीत. कारण नवी महापालिका झाली तर तिथं करप्रणाली सुरू होणार, मग त्या तुलनेत सुविधा दिली जाते का? असा पहिला मूलभूत प्रश्न उभा राहतो. ज्या मोठ्या ग्रामपंचायती आहेत, त्यांची  इच्छा असेल तर पुणे अथवा पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्यात येईल. अथवा त्या ग्रामपंचायतींची निर्मिती नगरपंचायतमध्ये करता येतील. मग पुढं जाऊन नव्या महापालिकेचा विचार होऊ शकतो. अशी प्रक्रिया असते, असंही ते म्हणाले.


पुण्याच्या पाण्याचं काय?


पुणेकर अधिक पाणी वापरतात असं आम्ही म्हणत नाही, पण कागदावर प्रति पुणेकर सर्वाधिक पाणी वापरतो, असं दिसून येतंय. आता जर पुणेकर पाणी वापरत नसतील तर मोठया प्रमाणात पाण्याची गळती होते अथवा याची चोरी होते. त्यामुळे याकडेदेखील लक्ष देणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. बालगंधर्व रंगमंदिर बाबतीत पुनर्विकासचा विचार मागील काही दिवसांपासून सुरु आहे. त्यासंदर्भात  काही निर्णय घेतला तर उद्या माझ्या विरोधात मोर्चे निघतील. त्यामुळे याबाबत ही पुणेकरांनी ठरवावं, असंही त्यांनी म्हटलं आहे. 


उद्योजकांकडून वसूली करणं हा धंदाच...


उद्योजकांकडून वसुली करणं हा धंदाच झाला आहे. या सगळ्या वसुली एजंटला धडा शिकवायला पाहिजे. त्यांना धडा शिकवण्याची मोहीम हाती घेतली आहे. लवकरच त्याचे परिणाम दिसणार आहेत. उद्योजकांना ही विनंती आहे की त्यांनी थेट गृह विभागाला, वेळ पडल्यास थेट मला कळवावं. तुमचं नाव पुढं येणार नाही. पुणे जिल्ह्यात आलो की वसुली होते, गुंडागर्दीला सामोरं जावं लागतं. हे चित्र बदलणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


संबंधित बातमी-


Purandar Airport News: मोठी बातमी! पुरंदर विमानतळाला जागा देण्यास गावकऱ्यांचा नकार; गावकरी देवेंद्र फडणवीसांकडे देणार निवेदन