पुणे : पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी (Pune Porsche car accident) वाढत आहे. त्यातच ललित पाटील प्रकरण, ड्रग्स प्रकरण त्यानंतर गांजा प्रकरण आणि आता हिट अॅड रन प्रकरण. या सगळ्या प्रकरणावरुन खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना धारेवर धरलं आहे. राज्यातल्या महत्वाच्या शहराकडे गृहमंत्र्यांचं लक्ष नाही. त्यामुळे गुन्हेगारी आणि हिट अॅन्ड रनचे प्रकरणं घडत आहेत, असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला आहे.गृहखात्याने येथील कायदा सुव्यवस्थेची स्थिती पुर्ववत करण्यासाठी प्रयत्न करावे आणि नागरीकांना विश्वास द्यावा, अशी मागणीदेखील सुप्रिया सुळेंनी केली आहे. सुळेंनी ट्विट करत ही मागणी केली आहे. 


सुप्रिया सुळेंनी ट्विटमध्ये लिहिलंय की, पुणे शहरात देश-विदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत. याखेरीज आयटी उद्योगामुळे देशभरातील अभियंते येथे काम करीत आहेत. शिवाय विविध क्षेत्रातील तज्ज्ञ लोकही पुण्याला आपली पसंती देतात. पुणे हे शहर कला आणि सांस्कृतिक घडामोडींच्या दृष्टीने देखील जगभरात प्रसिद्ध आहे. ‘शिक्षणाचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शांतताप्रिय पुण्यात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे शहराच्या एकंदर प्रतिमेला तडा जात आहे. शहरात ड्रग्ज आणि गांजासारखे अंमली पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याचे दिसते.येथे कोयता गँग आणि इतर गुन्हेगारीने उच्छाद मांडला असून कल्याणीनगर ‘हिट अँड रन’ प्रकरणानंतर शहरातील कायदे आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. स्वतः गृहमंत्र्यांना शहरात ठाण मांडून बसावे लागले ही बाबच परिस्थितीचे गांभीर्य पटवून देण्यास तसेच शासन आणि गृहमंत्र्यांचे कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यातील अपयश अधोरेखित करण्यासाठी पुरेशी आहे.


गृहमंत्र्यांचं पुण्याकडे लक्ष  नाही!


गृहमंत्री महोदयांचे पुण्यासारख्या महत्वाच्या शहराकडे लक्ष नाही. त्यामुळे येथे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असून त्याचा सर्वसामान्य लोकांना त्रास होत आहे. यासोबतच शहरातील सामाजिक सुरक्षा धोक्यात आली आहे. राज्याच्या गृहखात्याने अजूनही वेळ न घालविता शहराकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. गृहखात्याने येथील कायदा सुव्यवस्थेची स्थिती पुर्ववत करण्यासाठी प्रयत्न करावे आणि नागरीकांना विश्वास द्यावा, हे सद्यस्थितीत अतिशय महत्वाचे आहे, असंही सुप्रिया सुळेंनी ट्विटमध्ये लिहिलंय.


 




इतर महत्वाची बातमी-


Pune Porsche Car Accident : डॉ. अजय तावरेंनी आणखी एक चुकीचा अहवाल दिला? मुलानी-शेख कुटुंबाने कुंडली बाहेर काढली, चौकशी समिती हे पण तपासणार का?


Pune Porsche car Accident : अपघातग्रस्त पोर्शे कार प्लॅस्टिकने गुंडाळली, जर्मनीची टीम पुण्यात येणार, नेमकं कारण काय?