पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील साट्यालोट्याच्या राजकारणाचा फटका पुण्याला बसतोय. राज्य सरकारने पुढाकार घेऊन कोरोना रुग्णांसाठी उभारलेल्या दोन्ही जम्बो हॉस्पिटलचा बोजवारा उडालाय तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांनी उभे केलेली कोरोना हॉस्पिटल अजून सुरूच झालेली नाहीत. पण तरीही पुण्यातील भाजप आणि राष्ट्रवादीने तेरी भी चूप मेरी भी चूप अशीच भूमिका घेतलीय. उलट पुण्यात चांगलं काम झालंय असंच प्रशस्तीपत्र फडणवीस वारंवार देतायत.


एकीकडं पुण्यात कोरोनामुळं होणाऱ्या मृत्यूंचा आकडा झपाट्यानं वाढतोय तर दुसरीकडं मोठा गाजावाजा करून सुरु करण्यात आलेली हॉस्पिटल अजूनही पूर्ण क्षमतेनं सुरु झालेली नाहीत. काही तर अजून रुग्णांच्या सेवेतच आलेली नाहीत. तरीही याबाबत सगळेच राजकारणी मूग गिळून गप्प आहेत. याला कारण म्हणजे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेलं सख्य. राज्यभर आगपाखड करणारे देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातील परिस्थितीबाबत विचारलं असता, पुण्यात चांगलंच काम झालंय. असं प्रशस्तीपत्र आत्तापर्यंत त्यांनी वारंवार दिलंय.


पुण्यात मास्क न वापरल्यास होऊ शकतो एक हजार रुपये दंड!


पत्रकार पांडुरंग रायकर यांना व्यवस्थित उपचार न मिळाल्याने झालेला मृत्यू आणि खाजगी रुग्णालयात बेड न मिळाल्याने पुण्याचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांचा आणि त्यांच्या मुलाचा झालेला मृत्यू. या दोन उदाहरणांनी पुण्यातील परिस्थिती किती भयंकर आहे, हे लक्षात आलं. तरीही पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी भाजपच्या सत्तेत असलेल्या महापालिकेच्या कारभाराभावर मौन सोडलेलं नाही.


अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचे हितसंबंध सामान्य पुणेकरांच्या जीवावर


कोरोनाची परिस्थिती हाताळताना जर काही त्रुटी असतील तर विरोधकांनी त्या लक्षात आणून देणं आवश्यक आहे. राज्यात महाविकासआघाडीची तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आहे. राज्य सरकारने उभारलेली हॉस्पिटल्स असतील अथवा दोन्ही महापालिकांनी उभारलेली हॉस्पिटल्स असतील ही पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना वेळेत उपलब्ध होत नाहीयेत. तरीही भाजप आणि राष्ट्रवादीचं 'तेरी भी चूप, मेरी भी चूप असा मामला सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच आता ऍक्टिव्ह मोड मध्ये आहेत. गुरुवारी त्यांनी पिंपरी चिंचवडचा अचानक दौरा केला तर उद्या केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासोबतच्या बैठकीला ही ते पुण्यात उपस्थित राहणार आहेत.


PMPML | पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये बससेवा आरंभ, प्रवासासाठी 'हे' नियम पाळावेच लागणार