Amol Kolhe Instagram Froude: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या नावाने ऑनलाईन पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रकार घडत असल्याची माहिती आहे. याबाबत स्वत: अमोल कोल्हे यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत माहिती दिली आहे. फेक अकाऊंट काढून त्यावर त्यांच्या नावाने पैसे उकळत असल्याचा प्रकार घडत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यासोबतच त्यांनी काही स्क्रिनशॉटदेखील शेअर केले आहेत. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
अमोल कोल्हे यांच्या नावाने एक फेक अकाऊंट तयार करण्यात आलं आहे. त्यावरुन हा पैसे उकळल्याचा प्रकार सुरु आहे. 20000 हजार रुपये ऑनलाईन पाठवण्याची मागणी केल्याची माहिती या पोस्टमध्ये दिसत आहे. या सगळ्या प्रकाराबाबात सावध राहण्याचा सल्ला त्यांनी चाहत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यांच्या प्रत्येक पोस्टची चर्चा होते. चित्रपट असो किंवा राजकारण त्यांचे चाहते दोन्ही क्षेत्रात प्रचंड मोठ्या संख्येत आहेत. त्यांना आदर्श मानणारा वर्गही मोठा आहे. त्यामुळे कोणाची फसवणूक होऊ नये, यासाठी त्यांनी ही पोस्ट केली आहे.
पोस्टमध्ये नक्की काय आहे?
"@kdr.amol या नावाने Instagram profile बनवून लोकांना मेसेज पाठवले जात आहेत आणि पैशाची मागणी केली जातेय. फोटो नाव सेम दिसत असलं तरी या फेक प्रकारापासून सावध रहा. माझ्या व्हेरिफाईड अकाउंटचं इंस्टा युझरनेम @amolrkolhe असं आहे. @kdr.amol या फेक प्रोफाईल संदर्भात रितसर तक्रार केलेली आहे. कृपया अशा प्रकारांपासून सावध रहा. काळजी घ्या", असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.
ऑनलाईन फ्रॉडपासून सावधान
सध्या सगळीकडे ऑनलाईन फ्रॉडचं प्रमाण वाढलं आहे. त्यात फेक आयडीवरुन मेसेज करुन पैसे उकळल्याचे प्रकरणं रोज समोर येत आहेत. या सगळ्या प्रकारापासून सावध रहा. खात्री केल्या शिवाय कोणाला पैसे पाठवू नका. या संदर्भातील रोज शेकडो तक्रारी जमा होत असल्याने पोलिसांकडून वारंवार अशा प्रकारे जनजागृती करण्यात येते. नागरीकांना आवाहन देखील करण्यात येतं मात्र नागरीक या सापळ्यात सहज ओढले जात असल्याचं चित्र रोज समोर येत आहे.