PCMC News: पिंपरी चिंचवड महापालिकेत (PCMC) भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात सुरू झालेली विकासकामे जाणीवपूर्वक रखडवली जात असल्याचा आरोप करत आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge) यांनी पुन्हा पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले. प्रशासकीय काळात रखडलेली कामे तातडीने मार्गी लावावी. आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पातून शहराला पाणी देण्याबाबत प्रशासनाची संथ गतीची कारवाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील महत्त्वाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार लांडगे यांनी चिंचवडच्या ऑटो क्लस्टर सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या शहरातील रखडलेल्या कामांवर त्यांनी लक्ष केंद्रीत केलं होतं. आमदार लांडगे यांनी शहरातील समस्या सोडविण्याचे आदेश दिले. त्रिवेणीनगर येथील रस्त्याचे काम पूर्ण करावे, बाधित नागरिकांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी. ताळगाव चिखली येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम तातडीने सुरू करावे, टाऊन हॉलच्या कामाला गती द्यावी, अशा सूचना देखील केल्या
चिखली ते चर्होली दरम्यान पालिकेने संपादित केलेल्या जागेत गाय कोठार विकसित करता येईल का, याची पडताळणी करावी. भोसरी थोरल्या पादुका चौकातील संत शिल्प आणि भित्तीचित्रांचे काम लवकर पूर्ण करावे. भोसरीत बाल रुग्णालयाचे नियोजन करावे. कुस्ती संकुल व भोसरीतील कबड्डी संकुलात खेळाडूंना राहण्याची सोय करावी. यासाठी 120 खाटांची क्षमता असलेल्या वसतिगृहाचे काम लवकर करण्यात यावे. यमुनानगर, निगडी परिसरातील अनेक घरांवर रेड झोन मार्किंग होत आहे, ते निश्चित करण्यात यावे. रेड झोनची व्याख्या संरक्षण खात्याने करावी, अशा विविध मागण्याही त्यांनी केल्या.
आंध्र, भामा आसखेड प्रकल्प, क्रिकेट स्टेडियम, सफारी पार्क, मोशी तसेच पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि चिखली रुग्णालयाच्या जागेबाबत संबंधित विभागांसोबत तातडीची बैठक घेण्याचे आदेश दिले. कणबे चौक ते भक्ती-शक्ती चौक हा रेड झोनमधून पुनर्विकास करण्यासाठी अहवाल सादर करावा. अनेक सोसायट्यांमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद आहेत. याबाबत सर्वेक्षण करून संबंधितांवर कारवाई करावी. आमदार लांडगे यांनीही पर्यावरण संवर्धनासाठी विविध सूचना केल्या आहेत.