Deepak Kesarkar In Pune: शिवसेना नेते आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray ) उत्तर देण्यासाठी मी मंत्री झालो नाही तर जनतेची सेवा करण्यासाठी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी मंत्री झालो अशी टीका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरीच्या सभेत बोलताना शिंदे गटाविरोधात घोषणाबाजी केली त्यांच्यावर अनेक आरोप केले त्याला प्रत्युत्तर दीपक केसरकरांनी दिलं आहे.
सभेतील जल्लोष आणि मतदान यात फरक असतो. हा फरक आदित्य ठाकरे यांनी समजून घेतला पाहिजे. नेता हा मंचावरुन वेगवेगळे आरोप करण्यासाठी नसतो. गद्दार, खोके म्हणण्यासाठी नसतो तर नेता हा राज्याचा विकास करण्यासाठी असतो. जे नेते विकास करतात ते जल्लोष करत फिरत नाही. जनतेच्या भावना भडकवून त्यांच्यावर राज्य करण्याचा एक काळ होता. मात्र आता तो काळ उरला नाही आता जनतेला त्यांचं हित समजतं. त्यामुळे पीढिला भडकावण्याचं काम करु नये, असं देखील ते म्हणाले
आपण मंत्री म्हणून काय काम केलं ते सांगत राज्यभर दौरा करा. मंत्री असताना केलेल्या कामगिरीनंतर किती लोक तुम्हाला साथ देतात हे कळेल. महाराष्ट्राला दिशा द्यायाची असेल तर तसं नेतृत्व महाराष्ट्राला लाभलं पाहिजे. आमचं ठाकरे कुटुंबींयावर प्रेम आहे मात्र अशाप्रकारे जर काहीही बोलून राजकारण करत आहेत आमच्यासारख्या कार्यकर्त्या असलेल्यांना बोलावं लागतं. ज्यांनी अनेक वर्ष राजकारणात काम केलं त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करुन द्यावी लागते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
तुम्ही महाराष्ट्रातील तरुणाईला चुकीच्या मार्गाने नेऊ शकता. घोषणाबाजी करु शकता मात्र त्यांना तुम्ही भविष्य देऊ शकत नाही. तरुणांच्या भविष्याचा विचार करणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं कर्तव्य आहे. जो पक्ष किंवा नेते तरुणांच्या भविष्याचा विचार करु शकत नाही त्यांना राजकारणात राहण्याचा हक्क नाही. अर्थ खात्याचे आणि इंडस्ट्रीजचे मंत्री आणि राज्यमंत्री असतात. यांच्या मागील अडीच वर्षाच ठाकरे सरकार असताना किती बैठका झाल्या असे प्रश्न जनतेने विचारले पाहिजे आणि झाल्या नसतील तर महाराष्ट्राला मागे नेण्यात ठाकरे सरकारचा किती मोठा हात आहे, हे स्पष्ट होईल, असा आरोपदेखील त्यांनी केला आहे.
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही नेते पूर्ण वेळ देतात आपलं काम करतात.घरात बसून राज्य चालवायचे दिवस गेले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किती वेळ मंत्रालयात आले आणि आदित्य किती वेळा आले, हे आपल्याला माहित आहे. उद्धव ठाकरे आजारी होते पण आदित्य याचं काय?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.