पुणे : लिफ्टच्या दोन मजल्यांमध्ये अडकून गंभीर जखमी झालेल्या सात वर्षीय मुलीचा पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना पुण्यातील घोरपडी पेठ भागातील झोहरा कॉम्प्लेक्समध्ये शनिवारी संध्याकाळी घडली होती. ज्या लिफ्टमध्ये अडकून नशरा रेहमान खान (वय 7) मृत्यूमुखी पडली, ती लिफ्ट अनेकवेळा बंदच असायची आणि सुरू असली की त्यामध्ये याआधीही अनेक लोकं अडकल्याच्या घटना घडल्या आहेत, असा आरोप तेथील रहिवाशांनी केला आहे.

अनेकवेळा तक्रारी देऊनही या लिफ्टची दुरुस्ती बिल्डरकडून झाली नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे. तर तपास सुरू असून दोषींची गय केली जाणार नाही, अशी माहिती पोलीस उप निरीक्षक कल्याणी पडोळे यांनी दिली. नशराला जेव्हा लिफ्टमधून बाहेर काढलं तेव्हा तिला तातडीने रुग्णालयात नेणं भाग होतं. परिस्थिती पाहून पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पडोळे यांनी स्वतः एका स्थानिकाच्या मदतीने तिला त्यांच्या गाडीवर दवाखान्यात नेलं.

शनिवारी काय घडलं?

शनिवारी नशरा दिवसभर घरीच खेळत होती. सांयकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ती आजीकडून पैसे घेऊन खाऊ आणण्यासाठी खाली गेली. त्यानंतर थोड्या वेळाने आजीला तिच्या रडण्याचा आवाज आल्याने बाहेर येऊन पाहिलं असता लिफ्टच्या दोन मजल्यांमध्ये नशरा अडकलेली होती. अग्निशमन दलाला याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने येऊन नशराची सुटका केली आणि गंभीर जखमी अवस्थेत तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. तपासणीअंती डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं.

महाराष्ट्र लिफ्ट कायदा बदलण्याची मागणी

''महाराष्ट्रात लिफ्टमुळे गेल्या दोन ते अडीच वर्षात 25 जणांचा मृत्यू झाला, ज्यात 6-7 मुलांचा समावेश आहे. त्यामुळे रहिवासी इमारतीत मॉलप्रमाणे काचेच्या लिफ्ट असायला हव्यात, ज्यामुळे तात्काळ मदत पोहोचेल. लहान मुलांना एकटं लिफ्टमध्ये जाऊ देऊ नये आणि राही वाहन सुरक्षा रक्षकांना लिफ्ट बंद पडल्यावर ती उघडण्याचे प्रशिक्षण द्यावे, त्यामुळे लोकांमध्ये भीती बसणार नाही. यासाठी महाराष्ट्र लिफ्ट कायदा बदलण्याची आवश्यकता आहे. याबाबत येत्या अधिवेशनात मागणी करणार आहे,'' असं काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ यांनी म्हटलं आहे.