पुणे : तुमच्या माझ्या घरचे लग्न नाही, नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. कार्यकर्त्यांनी आपल्यापरीने सगळी कामं करायची आहे कोणीही रुसून आणि नाराज होऊन काम करु नका, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) कार्यकर्त्यांना प्रेमळ दम दिलं आहे. त्यासोबतच कार्यकर्त्यांनी मतदार संघात कसं वागलं पाहिजे, प्रचार करताना कोणत्या पद्धतीची भाषा पाहिजे, याचे धडेदेखील अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिले आहे. आपल्या महायुतीतील एकही कार्यकर्ता बाहेरच्या पक्षात जाणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहन अजित पवारांनी यावेळी केलं आहे. पुण्यात महायुतीचा (Pune Loksabha election) पहिलाच मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात ते बोलत होते. 


'सध्या अनेक ठिकाणी रुसवेफुगवे दिसत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्याला बोलवलं नाही, आपला फोटो लावला नाही, या क्षृल्लक कारणावरुन रुसु नये, आपले सगळे मतभेद दूर केले पाहिजे. हे आपल्या घरचं लग्न नाही आहे. तर आपल्याला मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे', असा प्रेमळ दम त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. 


अजित पवार कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की, कार्यकर्त्यांनी आपली भाषा नीट ठेवली पाहिजे. साधारण मतदार संघात फिरताना कार्यकर्त्यांनी आपल्या मतदारांशी आणि विरोधात असलेल्या मतदारांशीदेखील नीट वागलं पाहिजे. विरोधात असलेल्या मतदारांशी हुज्जत न घालता त्यांच्यासोबत खेळीमेळीचं वातावरण ठेवलं पाहिजे. आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही, याची काळजी घ्या, असे अनेक धडेदेखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.


'चारही उमेदवार विजयी झालेच पाहिजे'


'मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महायुती एकत्र आली आहे. त्यामुळे कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ्याचं बटन दाबून पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निवडून आणायचे आहेत. त्यासाठी तुम्ही कुठेही कमी पडता कामा नये', असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं. 


'मी डोक्यावर बर्फ ठेवून घराबाहेर पडतो'


अजित पवार म्हणाले, 'रोज सात वाजता घराबाहेर पडताना तोंडात साखर ठेवून आणि डोक्यावर बर्फ ठेवून घराबाहेर पडतो. आपण आज कोणावरी चिडायचं नाही आणि आरडाओरड करायची नाही, असं स्वत:लाच सांगतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनो तुम्हीदेखील काही दिवस डोक्यावर बर्फ ठेवून घराबाहेर पडा'


'सोशल मीडिया नीट वापरा'


लोकसभेच्या निवडणुकीत कार्यकर्ता सगळ्यात महत्वाचा आहे. त्यामुळे आपला कार्यकर्ता कोणत्या वेगळ्या पक्षात जाणारा नाही याकडे लक्ष ठेवा. उलट दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ते आपल्या पक्षात आणा. सोबतच आपल्या सोशल मीडियाकडे सर्वांचं लक्ष असतं. त्यामुळे सोशल मीडिया नीट वापरा. आचारसंहितेंचा भंग होणार नाही, याची काळजी घ्या. निवडणुकीत सोशल मीडिया महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे सोशल मीडिया नीटच वापरला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.  


 


इतर महत्वाची बातमी


-मी जे सांगायचे ते सांगितलं, मला मूर्ख समजू नका; 'त्या' प्रश्नावरुन अजित पवारांनी पत्रकारांना फटकारलं!



-मतदार जागृतीच्या बोर्डावर ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘नोटा’; पुण्यातील गोखले संस्थेत नेमका कोणता प्रकार घडला?