पुणे : मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या कन्येने राजकारणात आगमन केलं आहे. 22 वर्षांच्या सायली वांजळेने स्वतःचा मेकओव्हर केला आहे. सायलीने काही किलोंनी वजन घटवून आपलं राजकीय वजन कमालीचं वाढवलं आहे.
पुण्यातील वारजे माळवाडी (प्रभाग क्रमांक 32) मधून राष्ट्रवादीतर्फे सायली रिंगणात उतरली होती. 13 हजार 956 मतं मिळवत तिने ही निवडणूक जिंकली. 116 किलो वजन असलेल्या सायलीने 60 किलो वजन घटवलं आहे.
गोल्डमॅन अशी ओळख असलेले मनसेचे आमदार रमेश वांजळे यांचा 2011 मध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. त्यांचा राजकीय वारसा चालवण्यासाठी सायली सक्रिय राजकारणात उतरली आहे. पुण्याच्या विमलाबाई गरवारे कॉलेजमधून सायलीने पॉलिटिक्स विषयातून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे.
'राजकारणात येण्यापूर्वी फीट असावी, अशी माझी इच्छा होती. त्यामुळे डाएट आणि जिम या दोन्हीच्या मदतीने मी 60 किलो घटवले. आता माझं वजन 56 किलो आहे, असं सायली सांगते. सकाळी 8 ते रात्री 9 असं सतत मी माझ्या वॉर्डातील नागरिकांना भेटायचे. लिफ्ट ऐवजी मी जिन्याने बिल्डिंग चढायचे, याचाही फायदा झाला, असं सायलीला वाटतं.
झोपडपट्टीवासियांचं पुनर्वसन, वंचित विद्यार्थ्यांसाठी शाळा अशा सुविधा तिला उपलब्ध करुन द्यायच्या आहेत. माझ्या वडिलांची इच्छा होती, मी नागरी सेवांमध्ये रुजू व्हावं. ते माझे आदर्श होते, असंही सायली म्हणाली.