पुणे : पुण्यात पुरुषांचे नग्न व्हिडीओ कॉल व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या अनेक तक्रारी सायबर पोलिसांकडे दाखल झाल्यात. ब्लॅकमेल करण्यात येणाऱ्या या पुरुषांना अनोळखी नंबरवरून व्हिडीओ कॉल यायचा. व्हिडीओ कॉल करणारी महिला आधी स्वतःचे नग्न व्हिडीओ दाखून दुसऱ्या बाजूला असलेल्या पुरुषांनाही नग्न होण्यास सांगायची, त्यानंतर काही दिवसांनी या पुरुषांना पैशांची मागणी करणारा फोन यायचा आणि पैसे न दिल्यास व्हिडीओ कॉलवेळी रेकॉर्ड झालेला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी दिली जायची. त्यामुळं अनोळखी व्यक्तींकडून येणारे व्हिडीओ कॉल न उचलण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय.
व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचा नवीन प्रकार पुण्यात फोफावतोय. हा व्हिडीओ कॉल करणारी महिला आधी ज्याला व्हिडीओ कॉल केला आहे त्याच्याशी ओळख वाढवते. त्यानंतर काही दिवसांनी सलगी वाढल्यावर व्हिडीओ कॉल सुरु असतानाच स्वतःचे कपडे काढते आणि ज्याला व्हिडीओ कॉल केलेला आहे त्या व्यक्तीलाही नग्न होण्यास सांगते . असं दोन - तीन वेळा झाल्यानंतर त्या व्यक्तीला काही दिवसांनी व्हॉट्सअप ऑडियो कॉल केला जातो आणि पैशांची मागणी केली जाते. पैसे न दिल्यास रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओ मधील व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली जाते. आतापर्यंत अशाप्रकारे ब्लॅकमेल केल्या गेल्याच्या आठ तक्रारी सायबर पोलिसांकडे दाखल झाल्यात. मात्र अशाप्रकारे फसवले गेलेल्यांची संख्या आणखी जास्त असू शकते असा पोलिसांचा अंदाज आहे.
पुणे पोलिसांच्या सायबर सेलचे पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार फसवल्या गेलेल्या आठ व्यक्तींनी त्याच्याकडे तक्रार दाखल केली असुन त्या आधारे तपास केला जातोय. फसवणुकीच्या या प्रकारात फोन कॉलचा उपयोग न करता व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलचा उपयोग करण्यात आलाय. जेणेकरून फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचा फोन नंबर समजणार नाही. इंटरनेटच्या आधारे हे कॉल करण्यात आलेत. त्यामुळं कॉल करण्यासाठी ज्या इंटरनेट कनेक्शन आधार घेतला गेलाय त्याचा शोध घेणं चालू आहे असं पोलिस निरीक्षक पायगुडे यांनी म्हटलयं. पायगुडे यांच्या मते अशाप्रकारे फसवणूक झालेल्यांची संख्या बरीच मोठी आहे. मात्र लोक बदनामी टाळण्यासाठी तक्रार दाखल करायला पुढं येत नाहीत, त्यामुळं फसवणूक करणाऱ्यांच फावतं. महत्वाची बाब म्हणजे फसवणूक करणारी कोणी एकच व्यक्ती नाही किंवा एकच टोळी नाही तर अशा अनेक टोळ्या सक्रीय झाल्यात.
ज्यांना अशाप्रकारे ब्लॅकमेल करण्यात आलयं अशांमध्ये सर्व वयोगटातील आणि सर्व स्तरातील पुरुषांचा समावेश आहे. एवढंच नाही तर काही महिलाही अशा प्रकारे फसवल्या गेल्यात असं पोलिसांच म्हणने आहे. फसवल्या गेलेल्या व्यक्तींकडे आधी चार- पाच हजार रुपयांच्या स्वरुपात पैशांची मागणी होते. हळूहळू ही मागणी वाढत जाते. अशाप्रकारे ब्लॅकमेल झालेल्या काही व्यक्ती पोलिसांबरोबरच वकिलांच्या मदतीने यातून सुटण्यासाठी प्रयत्न करतायत. सायबर गुन्ह्यांमध्ये वकील असलेल्या गौरव जाचक यांच्याशी अशा काही व्यक्तींनी संपर्क साधल्यानंतर त्यांनी आधी पोलिसांकडे तक्रार देण्याचा सल्ला त्यांना दिलाय.
गौरव जाचक यांच्यामते अशाप्रकारे फसवणूक झालेल्या व्यक्ती अनेकदा पोलिसांकडे जाण्याऐवजी प्रायव्हेट डिटेक्टीव्हकडे जाता येईल का याची चाचपणी करतात. मात्र आपल्याकडे आलेल्या अशीलांना आपण आधी पोलिसांकडे जाण्याचाच सल्ला देतो. अॅडव्होकेट गौरव जाचक यांच्या मते अशा प्रकारे फसवणूक झाल्यास पुढे येऊन पोलिसांकडे तक्रार दिली पाहिजे आणि पोलिसांनी ही अशा तक्रारदारांना यांची माहिती गोपनीय राखली पाहिजे. फसवणूक करणाऱ्यांमध्ये काही महिला आणि पुरुष देखील सहभागी असावेत असा आपल्या अशिलांना संशय असल्याचा अॅडव्होकेट जाचक यांनी म्हटलंय आधी संपर्क करण्यासाठी महिलेचा उपयोग केला जातो. महिलेच्या आवाजातच व्हिडिओ कॉल आणि ऑडिओ कॉल केले जातात मात्र त्यानंतर शोचे कम्युनिकेशन आहे ते एखादी पुरुष व्यक्ती हाताळत असावी असाही फसवल्या गेलेल्यांना संशय आहे. त्याच बरोबर एखाद्या पुरुष व्यक्तीकडून महिला असल्याचा बनाव करून अशा प्रकारची फसवणूक केली जात असावी अशी शक्यता त्यांनी वर्तवली. व्हिडिओ कॉल झाल्यानंतर दुसऱ्याच कोणा व्यक्तीचा सोशल मीडिया वरती असलेला व्हिडिओ स्वतःचा म्हणून पाठवला जातो आणि त्याआधारे समोरच्या व्यक्तीची फसवणूक केली जात असावी अशीही शंका त्यांनी व्यक्त केलीय. या सापळ्यात अडकायचं नसेल तर अनोळखी व्यक्तींशी कोणत्याही प्रकारे संवाद न ठेवणं त्यांनी संपर्क केल्यास त्याला प्रतिसाद न देणे हाच आताच्या घडीला एकमेव मार्ग असल्याचं त्यांनी म्हटलंय.
असे प्रकार रोखायचे असतील तर लोकांनी स्वतः काळजी घेतली पाहिजे आणि अनोळखी व्यक्तीशी कोणत्याही स्वरुपाची चॅटींग करु नये असं आवाहन पोलिसांनी केलंय. पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्यामते सोशल मिडियाचा मर्यादित स्वरूपात वापर केल्यास अनेक समस्या टाळता येतील. फसवणूक झालेल्या व्यक्ती या फसवणूक आणि ब्लॅकमेलींगचा हा प्रकार कुठल्याही शहरात किंवा गावात राहणाऱ्या व्यक्तीसोबत घडू शकतो. अशाप्रकारे एखाद्याला ब्लॅकमेल करून झटपट पैसे मिळवू पाहणाऱ्यांची संख्याही वाढतेय. त्यामुळं आपणच काळजी घेतलेली बरी.