पुणे :  पुणे शहरातील बेलबाग चौकात रविवारी झालेल्या दही हंडीचा उत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या चौकापासून जवळ असलेल्या दोन ते तीन मंडळांच्या दहीहंडी पाहण्यासाठी प्रत्येक वर्षी गर्दी होत असते. यंदा मात्र त्याचं प्रमाण इतर वर्षाच्या तुलनेत अधिक होतं. गर्दी इतकी झाली की त्याठिकाणी चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती पहायला मिळाली. लहानांपासून अगदी ज्येष्ठांपर्यंत या गर्दीतून लोकं वाट काढताना दिसत होते. सुदैवाने याठिकाणी कुठला ही अनुचित प्रकार घडला नाही मात्र या व्हिडिओ मुळे येणाऱ्या गणेशोत्सवात गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनासमोर एक मोठं आव्हान असणार आहे. समुद्राच्या लाटांसारखी माणसं दिसत आहेत. अशावेळी जर काही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण किंवा कुणाला जबाबदार धरायचे? निर्बंधमुक्त उत्सव हे असे असतात का? अशा प्रतिक्रिया या व्हिडिओ वर आता उमटू लागल्या आहेत.

दहीहंडी पाहण्यासाठी झालेल्या प्रचंड गर्दीमुळे ढकलाढकली

गेल्या काही वर्षांपासून पुण्यात दहीहंडी उत्सवाची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई आणि रस्त्यांवर झालेली प्रचंड गर्दी यातून उत्सवाची रंगत चांगलीच वाढते. मात्र, यंदा या उत्सवात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवाजी रस्त्यावरील बेलबाग चौकात दहीहंडी पाहण्यासाठी झालेल्या प्रचंड गर्दीमुळे ढकलाढकली झाली. इतकेच नव्हे तर या गर्दीत टोळक्यांमध्ये भांडण आणि मारामारी झाल्याचे समोर आले आहे. चिंगराचेंगरी होण्याआधीच वाद आणि भांडणे पेटल्याने परिस्थिती गंभीर होण्याची भीती होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या गर्दी नियोजनावर टीका होत आहे. फक्त दहीहंडी उत्सवासाठी एवढी गर्दी होत असेल, तर गणेशोत्सवाच्या काळात परिस्थिती कशी हाताळली जाणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरवर्षी लाल महालपासून मंडईपर्यंत दहीहंडी उत्सवाचा माहोल दिसून येतो. यंदा मात्र गर्दीमुळे गोंधळाचे चित्र निर्माण झाले. पुण्यात उंच थर बसवले जात नसले तरी डीजे आणि देखाव्याच्या क्रेझमुळे तरुणाई मोठ्या प्रमाणात आकर्षित होताना दिसते.आता प्रशासन आणि पोलिसांनी दहीहंडी व आगामी गणेशोत्सवासाठी वेळेवर आणि योग्य नियोजन करणं अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.