पिंपरी-चिंचवड : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात भरदिवसा एकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ओंकार बाणखेले असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या डोक्यात अज्ञातांनी गोळी घातली, त्यामुळे खळबळ उडाली आहे. यात जखमी झालेल्या ओंकारचे उपचारापूर्वीच मृत्यू झाला. दुपारी दीड ते दोनच्या सुमारासची ही घटना आहे. ओंकार गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. मंचर पोलीस तिघांचा शोध घेतायेत.


पुण्यातील आंबेगाव तालुका हा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा मतदारसंघ आहे. त्यांच्याच मतदारसंघात येणाऱ्या एकलारे गावात ही धक्कादायक घटना घडली. एकलारे गावाजवळ ओंकार आणि त्याचा मित्र दुचाकीवरून निघाले होते. प ण मागून काळ येत होता, याची त्याला पुसटशी कल्पना ही नव्हती. कारण मागून येणाऱ्या दुचाकीवरून आलेले तिघे त्याचा खात्मा करण्यासाठी त्याच्या दिशेने आले. त्यांनी गाडी आडवी घातली, त्यामुळे त्यांना गाडी थांबवण्याशिवाय पर्याय उरला नाही. काही कळण्याआधी दोघे गाडीवरून उतरले, पैकी एकाने ओंकारच्या डोक्यावर बंदूक रोखली अन क्षणार्धात त्याने गोळीही झाडली. अगदी जवळून थेट डोक्यात गोळी झाडल्याने ओंकार वाचन कठीण होता अन अपेक्षेप्रमाणे उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले.


सुदैवाने ओंकारच्या साथीदाराला मात्र त्यांनी हात लावलेला नाही, अशी माहिती मिळत आहे. मात्र त्याच्या डोळ्यादेखत हे सर्व घडल्याने तो त्या धक्क्यातून अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे पोलिसांना अपेक्षित जबाब अद्याप प्राप्त होऊ शकला नाही. पण ओंकार हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याने त्याची हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असेल. असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्याअनुषंगाने मंचर पोलीस त्या तिघांचा शोध घेत आहे.


गृहमंत्र्यांच्या आंबेगाव मतदार संघात गुन्हेगारी उफाळून आल्याचं यानिमित्ताने दिसून येतंय. याआधी 25 मे च्या रात्री दोघांच्या हत्या झाल्या होत्या. दोन स्वतंत्र घटनेत एका राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा समावेश होता. तर जुलै महिन्यातच त्यांच्या लगतच्या खेड-आंबेगाव मतदारसंघात दुहेरी हत्याकांड घडलं होतं. विवाहबाह्य संबंधातून लोखंडी सळईने चटके देत, अमानुष मारहाण करण्यात आली होती. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातच नव्हे तर पुणे जिल्ह्यात एकामागोमाग एक घटना समोर येतायत. त्या रोखण्याचं गृह विभागासमोर मोठं आव्हान आहे.