पुणे : पुण्याच्या बिबवेवाडी परिसरातून दीड वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा सराईत गुन्हेगारांनी खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. सतत शिवीगाळ करुन धमकावत असल्याच्या कारणावरून आरोपींनी त्याचे अपहरण केले आणि त्यानंतर वरंधा घाटात नेऊन कोयत्याचे वार करून त्याचा खून केला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दीड वर्षांनी या खुनाचा छडा लावला असून यातील चार आरोपींना अटक केली आहे.


विशाल श्रीकांत जाधव ( 23 वर्षे), गणेश यशवंत चव्हाण (वय 23 वर्षे) , सुनील शंकर वसवे (वय 23 वर्षे) आणि दशरथ शिंदे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑक्टोंबर रोजी दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या वरील आरोपींना गुन्हे शाखा दोनच्या पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून त्यांची सात दिवसांची पोलिस कोठडी घेण्यात आली होती.


पोलिस कस्टडीमध्ये त्यांच्याकडे अधिक चौकशी सुरू असताना त्यांनी दीड वर्षापूर्वी मित्र दीपक बाबुराव वाडकर ( वय 23) याचा खून केल्याची कबुली दिली. शिवीगाळ करणे, जीवे मारण्याची धमकी देणे आणि पैशाच्या वादातून त्यांनी हा खून केला. आरोपी दीपक वाडकर याला वरंधा घाटात फिरण्यासाठी म्हणून घेऊन गेले. तिथे त्याला दारू पाजून कोयत्याने वार करून त्याचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह खोल दरीत फेकून दिला.


आरोपीने दिलेल्या कबुलीजबाबात नंतर पोलिसांनी बिबेवाडी पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली असता दीपक वाडकर मिसिंग असल्याची तक्रार दाखल होती. त्यानंतर युनिट दोनचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुण्यातील द अल्पायनिस्ट गिर्यारोहन संस्थेच्या मदतीने वरंधा घाटातील 600 फूट खोल दरीतून कुजलेल्या अवस्थेतील मानवी शरीराचे अवशेष जप्त केले.