पुणे : हडपसरजवळ शिंदे वस्तीमध्ये राहणाऱ्या प्रेमी युगुलाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रेमाला घरच्यांच्या विरोधामुळे पहाटे तीन वाजता दोघांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे.


 
दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं, पण तरुणाचं लग्न ठरवण्यात आलं होतं. त्यामुळे दोघांनी पळून जाऊन रेल्वे खाली आत्महत्या केल्याचं म्हटलं जातं. ससाणे रोड रामनगरजवळील रेल्वे रुळांवर पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मालवाहतूक गाडीखाली त्यांनी जीवन संपवलं. हडपसर पोलिस अधिक तपास करत आहेत.

 

शुक्रवारी रात्री 10.30 वाजता दोघांनी घर सोडलं. रात्री 2 वाजता त्यांच्या कुटुंबीयांनी हरवल्याची तक्रार दिली. त्यानंतर पहाटे 3.30 च्या सुमारास त्यांचे मृतदेह आढळून आले. तरुण 21 वर्षांचा असून तरुणी 18 वर्षांची आहे. तरुणी गेल्या वर्षी बारावी पास झाली होती. त्यानंतर ती घरीच असायची, तर तरुण त्याच्या वडिलांसोबत वेल्डिंगची काम करायचा.

 
त्यांचे मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दोघांकडे अद्याप कोणतीही चिठ्ठी सापडली नसून पोलिस पालकांकडे तपास करत आहेत.