पुणे : हॉस्पिटलमध्ये रुग्णाला देण्यात आलेल्या सूपमध्ये चक्क रक्ताने माखलेले कापसाचे बोळे सापडले आहेत. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी याचा व्हिडीओ बनवत हा सर्व प्रकार उजेडात आणला आहे. हॉस्पिटलच्या कँटिनमध्ये हे सूप बनवण्यात आलं होतं. पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णासाठी सूप देण्यात आलं होतं. मात्र या सूपमध्ये रक्ताने माखलेले कापसाचे दोन बोळे सापडले. त्यामुळे रुग्णालयात रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. रुग्णालयाकडून याप्रकरणी अद्याप कोणतही स्पष्टीकरण मिळू शकलेलं नाही. सूपमध्ये रक्ताने माखलेले कापसाचे बोळे असल्याचं पाहिल्यावर रुग्णाला मोठा धक्का बसला. रुग्णाच्या नातेवाईकांनी या सर्व प्रकाराचा व्हिडीओ बनवत कोरेगाव पार्क पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान पोलीस याप्रकरणी काय कारवाई करतात हे पाहावं लागेल. नेमकं प्रकरण काय? जहांगीर रुग्णालयात 29 एप्रिल रोजी महेश सातपुते यांची पत्नी प्रसूतीसाठी दाखल झाली होती. त्याच संध्याकाळी त्यांना मुलगी झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना सूप देण्यात आलं. सूप पिताना त्यांना सूपमध्ये रक्ताने माखलेले कापसाचे बोळे असल्याचं दिसून आलं. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महेश सातपुते यांनी मोबाईलमध्ये हा प्रकार कैद केला आणि कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दिली. घडल्या प्रकारानंतर जहांगीर रुग्णालय प्रशासनाने या घटनेशी संबंधित अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे.