पुणे : पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच अनेक खाजगी रुग्णालयं कोरोनावर उपचार करण्यासाठी काहीच्या काही शुल्क आकारत असल्याचं समोर येत आहे. असचं एक प्रकण पुण्यात उघडकीस आलं असून याप्रकरणी चार रुग्णालयांना नोटीस धाडण्यात आली आहे.


आदित्य बिर्ला, डी. वाय. पाटील, सिटी केअर आणि स्टार मल्टीस्पेशालिटी या चार रुग्णालयांना नोटीस धाडण्यात आल्या आहेत. विभागीय आयुक्तांनी गठीत केलेल्या समितीच्या पाहणीत या रुग्णालयांनी अवाजवी बिल आकारल्याचं निष्पन्न झालं आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारात विहित नियमांचे उल्लंघन केलं असल्यामुळे, रुग्णालयांवर दंडात्मक कारवाई का करू नये? असं या नोटीसद्वारे समितीचे प्रमुख आणि भारतीय राजस्व सेवेतील एन. अशोक बाबू यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.


सौम्य, गंभीर अथवा इतर कोणतीही लक्षणं नसणाऱ्या कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करु नये, असे निर्देश केंद्र आणि राज्य शासनाने दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन करून सर्रासपणे अशा रुग्णांना रुग्णालयात भरती केले जात असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. रुग्णांकडून पीपीई किटचे अव्वाच्या सव्वा रुपये आकारले जात असल्याच्या तक्रारींचा सूर आहे. त्यामुळे रुग्णालयातील एकूण दाखल रुग्णांची संख्या, रुग्णांकडून पीपीई किटचे आकारले जाणारे दर आणि प्रत्यक्षात रुग्णालयाने वापरलेले पीपीई किट याबाबतचा ताळमेळ सादर करायचा आहे.


एका आठवड्यात रुग्णालयाने सर्व माहिती सादर करायची आहे. आठवड्याभरात ही माहिती सादर न केल्यास कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. तसेच गंभीर लक्षणं आढळणाऱ्या कोरोना रुग्णांना तातडीने उपचारासाठी दाखल करून घ्यायच्या सूचना दिल्या आहेत. अॅडव्हान्स जमा करण्याचा आग्रह न धरण्याचे आवाहन देखील अशोक बाबू यांनी केले आहेत. तसेच ज्या रुग्णालयाबाबत अशा तक्रारी प्राप्त होतील त्यांच्या रुग्णालयात समिती थेट पोहचणार आहे. कोरोना रुग्णांवर उपचार देणाऱ्या रुग्णालयाच्या दर्शनी भागात सरकारने निश्चित केलेले दरपत्रक लावावे आणि तसेच दर स्वीकारणे बंधनकारक असल्याचं देखील अशोक बाबूंनी स्पष्ट केलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


पोलिसांची वर्दी घालून सोन्याचे दुकान लुटण्याचा चोरट्यांचा प्रयत्न


पुण्यातील दुकाने सुरू; P-1, P-2 पद्धत रद्द


पुण्यात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार, आरोपी 24 तासात अटकेत