पुणे : बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 6 आहे. काही दिवसांपूर्वी एका कोरोनाग्रस्त भाजीविक्रेत्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बारामतीकरांची चिंता वाढली होती. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या प्रशासकीय विभागाला सूचना केल्या आहेत. त्यानुसार बारामतीमध्ये 'बारामती पॅटर्न' राबवण्यात येत आहे. बारामतीचे प्रशासन, वैद्यकीय प्रशासन, पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी मिळून कोरोना व्हायरसवर मात करण्याकरिता बारामती पॅटर्नची सुरुवात केली आहे.


कसा आहे बारामती पॅटर्न?


बारामती नगरपरिषद परिसरातील 44 वार्ड, 44 नगरसेवक, 44 झोनल ऑफिसर आणि 44 पोलीस अधिकारी, कर्मचारी मिळून प्रत्येक वार्डात 10 ते 20 स्वयंसेवकांच्या माध्यमातून लोकांना घरपोच अत्यावश्यक सुविधा पुरवणार आहेत. एका स्वयंसेवकाला 35 ते 40 कुटुंबाची सेवा करण्याची संधी यातून मिळणार आहे. हे स्वयंसेवक प्रत्येकाच्या घरी जाणार त्या नागरिकांना आपला नंबर देणार अत्यावश्यक बाबींची गरज असल्यास नागरिकांनी त्यांना कॉल केल्यावर अत्यावश्यक सेवेकरता लागणारा खर्च (त्या वस्तू खरेदीकरिता येणारा खर्च) त्या कुटुंबातील व्यक्तीकडून घेतला जाणार आणि नागरिकांना घरपोच सेवा देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना घरी बसून सर्व सेवा मिळतील.


पोलीस दलाची जबाबदारी


पोलीस वार्ड परिसरात गस्त घालणार आहेत. शिवाय ड्रोनच्या माध्यमातून बाहेर पडणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. संपर्काकरिता वाकी-टॉकीचा वापर सुरू होणार आहे, त्यामुळे तात्काळ पोलीस घटनास्थळावर पोहोचणार आहेतच. सध्या बारामतीचे सर्व रस्ते सील केले असून यातून फक्त अत्यावश्यक सेवा पुरवणारे वाहने यांना सूट दिली गेली आहे. त्यामुळे बारामती शहरात कुणाला बाहेर जाता येणार नाही आणि बाहेरच्या व्यक्तीला बारामतीत येता येणार नाही. याची काळजी पोलीस प्रशासन रात्रंदिवस सध्या घेत आहेत... तसेच अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय प्रशासनालाही ही पोलिसांची मदत असणार आहे..


आरोग्य सुविधा


बारामती शहरात आजपासून अंगणवाडी सेविका या सर्वे करत आहेत. त्यामध्ये घरोघरी जाऊन कुटुंब प्रमुख व्यक्तीशी बोलून त्यांचा संपर्क नंबर घेऊन त्यांच्या घरातील कोणी आजारी आहेत का, याचा सर्वे अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविका यांनी सुरू केला आहे. त्यांच्या सर्वेनंतर आरोग्य विभागाचे डॉक्टर हे शहरात ज्या ठिकाणी काही नागरिक आजारी असतील, त्यांची तपासणी करणार आहेत. या तपासणीत जर गंभीर स्वरूपाचे नागरिक आढळले, तर त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जाणार आहे. जर कुणी संशयित कोरोनाबाधित आढळला तर त्यास तात्काळ क्वॉरंटाईन करून त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत.


नगरपालिका व नगरसेवक यांची भूमिका


प्रत्येक नगरसेवकाने 30 कुटुंबांपाठीमागे एक स्वयंसेवक अशा पद्धतीने 40 ते 42 स्वयंसेवकांची नेमणूक केली आहे. हे स्वयंसेवक अत्यावश्यक सेवा त्यांच्या प्रभागातील/ वार्डातील कुटुंबांना पुरवणार आहेत. यामध्ये दूध, भाजीपाला, औषधे, किराणा सामान यांचा समावेश असून सकाळी 9 ते 11 या वेळेत सोशल डिस्टन्स ठेवून स्वच्छता पाळून या सर्व गोष्टी सुरू केल्या आहेत. त्यामुळे बारामतीकरांना घरबसल्या अत्यावश्यक सेवांची पूर्तता होणार असून बारामतीकरांना बाहेर पडावं लागणार नाही.


ॲपची निर्मिती


बारामती पोलीस विभागाकडून एका अॅपची निर्मिती केली असून या ॲपच्या माध्यमातून बारामती शहरातील लोकांना त्यांच्या गरजेच्या वस्तू एका क्लिकवर मागवता येणार आहेत. हे अॅप सुरु करुन काही दिवसच झाले आहेत, मात्र त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.


अशा पद्धतीने बारामती पॅटर्न सध्या सुरू असून या पॅटर्नमध्ये बारामतीचे प्रांतअधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व अधिकारी काम करत आहेत. ज्या काही गोष्टींची कमतरता पडत आहेत त्यांचे निराकरण कसे करता येईल यावरती तात्काळ उपाययोजना केल्या जात आहेत.


संबंधित बातम्या




Corona Around the World | जगभरात कोरोना व्हायरसची सध्याची परिस्थिती काय आहे?