पुणे : गणेश चव्हाण, स्मार्ट सिटीसाठी निवड झालेल्या स्मार्ट पुण्याचा स्मार्ट नागरिक.. पुण्याला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी गणेशनं एक दोन नव्हे तर तब्बल 2 हजार स्मार्ट आयडिया सुचवल्या. मात्र त्या आयडिया दिल्याबद्दल गणेशला पालिकेकडून जो काही परतावा मिळाला तो नक्कीच स्मार्ट नाही.


'वरं जनहितमं ध्येयमं'.... अर्थात जनतेचं हित हेच आमचं ध्येय.. पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावरचं हे सुभाषित. मात्र खरंच जनतेच्या हिताचा विचार करणाऱ्यांची, पुणे महापालिकेच्या लेखी काय किंमत आहे ते गणेश चव्हाणला विचारा..

जनतेच्या कल्पनेतलं स्मार्ट पुणे साकारण्यासाठी महापालिकेनं स्पर्धा आयोजित केली आणि त्या स्पर्धेअतंर्गत पुणेकरांकडून स्मार्ट सिटीसाठी आयडिया मागितल्या. स्मार्ट पुणेकर असल्याचं सिद्ध करत, कम्प्युटर तज्ज्ञ गणेश चव्हाणनं महापालिकेला तब्बल 2 हजार आयडिया पाठवल्या. महापालिकेच्या स्मार्ट सिटी स्पर्धेत पहिला नंबर आला म्हणून गणेश चव्हाण चांगलाच खुश झाला, मात्र त्याचा हा आनंद जास्त काळ टिकला नाही.

वर्षभर महापालिकेनं त्याच्याशी कोणताही संपर्क ठेवला नाही. मात्र गेल्या आठवड्यात खुद्द पालिका आयुक्तांनी निमंत्रण धाडल्यानंतर गणेश चव्हाणला पुन्हा एकदा गगन ठेंगणं झालं. स्मार्ट पुण्यासाठी 2000 आयडिया सुचवणाऱ्या गणेश चव्हाणचा आयुक्त कुणाल
कुमार यांनी पाणउतारा केला.

आपल्या कल्पनांना पैशाच्या तराजूत तोलणाऱ्या आयुक्तांना गणेशनं खरमरीत पत्र पाठवून उत्तर दिलं आहे. पुण्याचे आयुक्त कुणाल कुमार यांच्या कृतघ्नतेवरती खुद्द महापौर आणि पुणेकरांनी टीकेची झोड उठवली आहे.

पुण्याला स्मार्ट बनवायला निघालेल्या आयुक्तांनी, आधी जनतेशी सुसंवाद साधण्याचा स्मार्टनेस दाखवायला हवा. कारण जिथं स्मार्ट नागरिकांच्या मताला किंमत नाही तिला स्मार्ट सिटी कसं म्हणायचं?