Gopichand Padalkar In Pune: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांनी  विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुण्यात उदय सामंत यांच्यावर हल्ला करण्यात आला होता तो राष्ट्रवादी काँग्रेसनेच केला असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी काल केला होता. त्यामुळे त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी आक्रमत भूमिका घेतली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विश्रामबाग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांची भेट घेऊन त्यांना तक्रार सुपूर्द केली  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप नेत्या रूपाली ठोंबरे आदी उपस्थित होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक गळ्यात भगवा घालून ते शिवसेनेच्या नावाने घोषणा देत आहेत. उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्यात पुण्यात मोठ्या प्रमाणे शिवसैनिक नाहीत ते राष्ट्रवादीचे लोक आहेत, असं पडळकर काल म्हणाले होते. जिथे जिथे मोठ्या रॅली किंवा सभा होतात तिथे तिथे शरद पवार यांची लोक उपस्थित असतात. यामुळे याच लोकांनी उदय सामंत यांच्यावर हल्ला केला असेल असा आरोप त्यांनी काल केला होता.


भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीवर, आदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आणि उदय सामंत यांच्यावरील हल्लाप्रकरणी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली होती. म्हसोबाला नाही बायको आणि सटवायला नाही नवरा, अशी महाविकास आघाडीतील तीन पक्षांची परिस्थिती झाली आहे. त्यामुळे हे तिन्ही पक्ष एकमेकांना सहकार्य करतायत असे, म्हणत पुन्हा एकदा पडळकर यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता. 


पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक
महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळे पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले आहे. त्यांनी थेट गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात तक्रार केली आहे. गोपीचंद पडळकर हा बेअक्कल माणूस आहे, अशी सडकून टीका  राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गोपीचंद पडळकरांनी केला आहे. आमच्या वकीलांकडून त्यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे. त्यांनी सगळ्यांची माफी मागावी, अशी मागणी देखील त्यांनी राष्ट्रवादीचे शहरप्रमुख प्रशांत जगताप यांनी केली आहे.