पुणे : सोशल मिडियावर शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल पुण्याच्या शिवाजी नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  पत्रकार भाऊ तोरसेकर आणि घनश्याम पाटील यांनी शरद पवार यांच्याबद्दल टाकलेल्या व्हिडिओवर पवारांना जीवे मारण्यासंबंधीत प्रतिक्रिया येत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि तक्रारकर्ते लक्ष्मीकांत खाबिया यांनी म्हटलं आहे.  खाबिया यांनी शरद पवार यांच्या जीवाला धोका असल्याची लेखी तक्रार पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दिली आहे.


भाऊ तोरसेकर, धनंजय पाटील यांनी काही व्हिडीओ अपलोड केले आहेत. त्या व्हिडीओच्या खाली कमेंटमध्ये शरद पवार यांच्याबद्दल द्वेष आणि त्यांना संपवण्याची भाषा केल्याच्या विरोधात ही तक्रार दाखल केली आहे. यामुळे शरद पवार यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार लक्ष्मीकांत खाबिया यांनी केली आहे. त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. काही वेबपोर्टलवरुन शरद पवार यांच्याविरोधात चिथावणीखोर भाषणांचे व्हिडीओ टाकले जात आहेत. त्याखाली शरद पवार यांच्याविरोधात टोकाच्या कमेंट केल्या जात आहेत. या कमेंटवरुन शरद पवार यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा आरोप लक्ष्मीकांत खांबिया यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर टोकाची, विद्वेषाची भावना पसरवली जात आहे. शरद पवार यांना संपवले पाहिजे, बॉम्बगोळ्यांचा वापर केला पाहिजे अशी भाषा वापरली जात आहे. त्यामुळे या प्रकरणी तातडीने तपास करुन संबंधितांवर कारवाई करण्याबाबत खाबिया यांनी तक्रार शिवाजीनगर पोलिस स्थानकात केली आहे.

दरम्यान आजच देवदर्शनाला आपल्याला कुणाच्या परवानगीची गरज नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या आरोपाला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पवार हिंदूविरोधी आहेत. त्यांना वारकऱ्यांच्या कुठल्याही कार्यक्रमात बोलावू नका, असं पत्रक राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वक्ते महाराज यांनी काढलं होतं. ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीमध्ये जोग महाराज पुण्यातिथी सोहळ्याला पवार यांनी उपस्थिती लावली होती.