Pune COEP News : कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये (COEP) गेल्या अनेक वर्षांपासून जतन केलेले दुर्मिळ खडक, खनिजे, जीवाश्म आणि स्फटिकांची माहिती पुणेकरांना लवकरच पाहता येणार आहे. 19 सप्टेंबर रोजी स्वत:चे 'जिओलॉजी म्युझियम' (Geology Museum ) सुरु करण्यात येत आहे. 1892 मध्ये बांधलेल्या विद्यापीठ कॅम्पसमधील जुन्या प्राचार्यांच्या बंगल्याचं या संग्रहालयात रूपांतर करण्यात आलं आहे. त्यामुळे फक्त सीओईपीच्या विद्यार्थ्यांनाच नाही तर इतरांना देखील या सगळ्या दुर्मिळ गोष्टी बघायला मिळणार आहे. याशिवाय अनेक संशोधकांनादेखील या म्युझियमचा फायदा होणार आहे. 


पदवी, पदव्युत्तर शिक्षण किंवा भूविज्ञानात कोणतंही संशोधन करत असलेले या संग्रहालयातील दुर्मिळ खडक आणि खनिजांचा अभ्यास करण्यासाठी येथे येऊ शकतात. 19 सप्टेंबर रोजी आमच्या विद्यापीठ मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते त्याचे अधिकृत उद्घाटन होणार आहे आणि मंडळाने फार कमी वेळात संग्रहालय उभारण्यासाठी मदत केली आहे, असे सीओईपी विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक संदीप मेश्राम यांनी सांगितले आहे.
 
या संग्रहालयात 12,000 हून अधिक विविध प्रजातींचे खडक, खनिजे आणि स्फटिकंअसेल. या संग्रहापैकी सुमारे 50 ते 60 खडक अत्यंत दुर्मिळ आहेत. पृथ्वीच्या कवचावर प्रथम तयार झालेले खडक, 60 प्रकारचे जीवाश्म तसेच रोझी क्वार्ट्ज, स्मोकी क्वार्ट्ज, अॅमेथिस्ट, स्टिलबाइट आणि स्टिबनाइट सारखे क्रिस्टल्स आहेत. खडक, खनिजे आणि स्फटिक वेगवेगळ्या रंगांचे आणि पोतांचे आहेत.


व्हर्चुअल प्रयोगशाळासुद्धा असणार


संग्रहालयात प्रदर्शित केलेले खडक, खनिजे आणि क्रिस्टल्सचे सर्व नमुने व्हर्चुअल प्रयोगशाळेचा भाग म्हणून ऑनलाइन अपलोड केले जातील जेणेकरून विद्यार्थी आणि जगभरातील कोठूनही कोणीही त्यांच्याबद्दल माहिती मिळवू शकणार आहे. आम्ही विविध प्रकारचे खडक, खनिजे, जीवाश्म आणि क्रिस्टल्सचे आमचे सर्व नमुने व्हर्चुअल अपलोड करण्याच्या प्रक्रियेत आहोत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या व्हर्च्युअल  प्रयोगशाळा विभागाकडून आम्हाला यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. यामुळे फक्त आमच्या COEP विद्यापीठातीलच नाही तर राज्यातील बारी महाविद्यालये आणि विद्यापीठांतील विद्यार्थीही येथे अभ्यास करू शकतात आणि संशोधन करू शकतात, असं मेश्राम यांनी सांगितलं आहे.


यासोबतच या संग्राहालया व्यतिरिक्त एक लाईट आणि म्युझीकल शोदेखील असणार आहे. ज्यामुळे विद्यार्थी स्क्रिनवर या सगळ्या खडकांना बघू शकतील  खनिजांचा अभ्यास करु शकतील. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या खडक आणि खनिजाचा वापर योग्य पद्धतीने संशोधकांना किंवा अभ्यासकांना कसा होईल, याकडे आम्ही विशेष लक्ष देणार असल्याचं मेश्राम यांनी स्पष्ट केलं आहे.