Cm Uddhav Thackeray in Baramati : आम्हीही इतके दिवस पवारांचे टीकाकार होतो. शिवसेनाप्रमुख मला सांगायचे की बारामतीत शरदबाबू जे करतायत ते बघायला हवे. राजकारणात देखील इनक्युबेशन सेंटर आम्ही पंचवीस- तीस वर्षांपूर्वी उघडले होते. इनक्युबेशन सेंटर म्हणजे उबवणी केंद्र. पण दुर्दैवाने काय उबवले हे आपण पाहतो आहोत. आम्हीही नको ती अंडी उबवली, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. ते बारामतीमधील कृषी महाविद्यालयातील इनक्युबेशन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. बारामती देशातील सर्वोत्तम केंद्र झाल्याशिवाय राहणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. 


राजकारणात एकमेंकाचं पटत नाही. ठिकाय नाही पटत. पण राजकारणात एकमेंकांचं पटत नाही म्हणून अडथळे आणणे ही काय वृत्ती आहे. हे आपलं राजकारण असू शकत नाही. ही आपली संस्कृती असू शकत नाही. तसे आपल्यावर संस्कार नाहीत. विकासकामाला पाठींबा जरी देता येत नसला तरी त्यात विघ्ने तरी आणता कामा नये. आपल्याकडे विघ्नसंतोषी खूप आहेत. पण त्या विघ्नसंतोषींना नेमकं मिळतं काय?, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. गेले दोन दिवस माझे पाय धरलेत.  पाय कधी डगमगत नाहीत.  डगमगणार नाही.  पण  गेले दोन दिवस झाले पाय धरलेत त्यामुळेच या कार्यक्रमास येण्यास उशीर झाला, असं मुख्यमंत्री म्हणाले.


यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची तोफ डागली. दिवाळी सुरु झालेलीच आहे. बॉम्ब फोडू. बॉम्ब फोडा पण धुर काढू नका. कारण कोरोना अजून गेलेला नाही, असं म्हणाले.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्या बारामतीमधील कामाचं कौतुक केलं. तसेच पुन्हा बारामतीला येणार, दोन्ही मुलांना घेऊन येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.






ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती मार्फत उभारण्यात आलेल्या 'इन्क्युबेशन व इनोव्हेशन सेंटर आणि विज्ञान संशोधन केंद्राचे' मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन झालं.