पुणे : केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून पुणे शहराला जागतिक स्तरावरील शहर बनविण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. देशातील थेट परकीय गुंतवणुकीपैकी 49 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येतेय आणि त्यापैकी सर्वाधिक पुण्यात येत असल्याचे सांगत पुण्याला देशातील एक नंबरचं शहर बनवणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे महापालिका व महामेट्रोच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात येणाऱ्या कर्वेनगर भागातील दुमजली उड्डाणपुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुणे शहरात महामेट्रोच्या माध्यमातून मेट्रोचे जाळे विणण्यात येत असून यामुळे वाहतुकीच्या समस्येवर कायमस्वरुपी उपाय होईल. एखादे शहर जागतिक स्तरावर विकसित होत असेल तर त्यामध्ये तेथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा वाटा असतो. मेट्रो हा वाहतुकीसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकतो. ही सुविधा प्रदूषणमुक्त, वेगवान आणि सुरक्षित आहे. या वाहतूक सुविधेच्या क्षमतेत वाढही करता येते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये मेट्रो वाहतूक सक्षम करण्यावर भर दिल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी आवर्जून सांगितले.
ज्यांना घर नाही अशा गरीब लोकांना महाराष्ट्र सरकार जमिनीचा पट्टा देणार आहे. जमीन देवून त्यावर घर बांधण्यासाठी पैसेही देणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील 90 टक्के लोकांना आरोग्यावर कोणताही खर्च करण्याची गरज नाही. केंद्र आणि राज्य सरकार तो भार उचलणार आहे. पंतप्रधानांनी सुरु केलेल्या आरोग्य योजनेत देशातील पन्नास कोटी लोक कव्हर होत असून त्याला राज्य सरकारने महात्मा फुले आरोग्य योजनेची जोड दिली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या चार वर्षांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. पुण्यात येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपची उमेदवारी खासदार अनिल शिरोळे यांना की पालकमंत्री गिरीश बापट यांना यावर चर्चा सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांचं वजन खासदार अनिल शिरोळे यांच्या पारड्यात टाकलं.
पुण्याला देशातील एक नंबरचं शहर बनवणार : मुख्यमंत्री
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Nov 2018 09:33 PM (IST)
देशातील थेट परकीय गुंतवणुकीपैकी 49 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येतेय आणि त्यापैकी सर्वाधिक पुण्यात येत असल्याचे सांगत पुण्याला देशातील एक नंबरचं शहर बनवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -