पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीने चांगलीच ( Pune Loksabha election 2024) कंबर कसली आहे. पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मैदानात उतरणार आहेत. आज पुण्यात महायुतीच्या मोळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे. पुण्यातील कार्यकर्त्यांना ते संबोधित करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना संबोधित करताना नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार दणक्यात सुरु आहे. भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि नेते मंडळी मुरलीधर मोहोळांच्या प्रचारासाठी हजेरी लावताना दिसत आहे. त्यातच चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील मोहोळांच्या प्रचारात सक्रिय सहभाग  दाखवला आहे. त्यानंतर आता थेट मुख्यमंत्री मोहोळांचा प्रचार करताना दिसणार आहेत. 


भाजपकडून प्रत्येक घर गाठण्यात येत आहे. त्यासोबतच प्रत्येक संस्थांनादेखील भेटी दिल्या जात आहेत. भाजपच्या 44व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून 'हर घर मोदी परिवार' या अभियानाअंतर्गत पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ 10 हजार कार्यकर्त्यांच्या माध्यमातून 10 लाख मतदारांपर्यंत ‘मोदींचा नमस्कार’ पोहोचविण्यात आला होता. घरोघरी मिळालेला पुणेकरांचा उत्साह भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा ठरला.


मुरलीधर मोहोळ यांची निवडणूक एकहाती ठरणार, अशी भाजपला खात्री होती. मात्र आता ही निवडणून तिरंगी होणार आहे. त्यात मोहोळांच्या विरोधात उभे ठाकलेले दोन्ही उमेदवार चांगलेच तगडे आहेत. त्यात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आहेत. ज्यांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आहे. त्यानंतर वंचितकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यात रवींद्र धंगेकरांचं पारडं काही प्रमाणात जड मानलं जात असल्याने भाजपला किंवा महायुतीला चांगलाच कस लावावा लागणार आहे. 


येत्या काळात महायुतीकडून प्रमुख्य नेत्यांच्यादेखील सभा आणि रोड शो घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील येण्याची शक्यता आहे. रवींद्र धंगेकरांना आणि वसंत मोरेंना पाडण्यासाठी भाजपकडून मोठी तयारी केली जात आहे. त्यात तयारीचा पहिला अध्याय आज पाहायला मिळणार आहे. येत्या काळात भाजप कसा प्रचार करणार?, प्रचारासाठी कोणती रणनिती आखणार?, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Supriya Sule :  हे दडपशाही करणारं सरकार; कांद्याच्या अन् दुष्काळाच्या प्रश्नावरुन सुप्रिया सुळेंकडून सरकारवर जोरदार टीका


Misal By Vishnu Manor : ना डीजे, ना रॅली, पुणेकरांकडून महापुरुषांना हटके आदरांजली; महात्मा फुले जयंंतीनिमित्त शेफ विष्णू मनोहर यांनी तयार केली 10 हजार किलो मिसळ