पुणे: पुण्यातील एनडीए येथे थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण आज पार पडलं. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह आमदार, खासदार उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी थोरल्या बाजीरावांच्या रणनितीबाबत आणि युध्दाच्या संदर्भात भाष्य केलं. 

Continues below advertisement


फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, ज्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्याची ज्योत पेटवली, त्या काळामध्ये संपूर्ण भारतामध्ये एक प्रकारे परकीय आक्रमकांना आम्ही स्वीकारलेला आहे अशी परिस्थिती होती किंवा भारतातील अनेक मोठे मोठे राजवाडे हे त्यांच्या अधिपत्याखाली काम करत होते, अशा काळामध्ये आई जिजाऊंच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य माणसातली विजिगिषु वृत्ती ओळखून ती प्रज्वलित केली. 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र केलं आणि अशी एक फौज उभी केली. मुघली साम्राज्य किंवा त्या काळातले जे चारही आक्रमक होते, अशा सगळ्यांना सळो की पळो करून सोडलं आणि स्वराज्याची स्थापना केली. दुर्दैवाने महाराज फार काळ जगू शकले नाहीत. पण, त्यांनी सामान्य मराठी माणसांमध्ये, त्याच्या रक्तामध्ये जो अंगार फुलवला होता, त्यामुळे महाराजानंतर ही जी क्रांती होती ती थांबली नाही. छत्रपती संभाजी महाराज, ताराराणी त्यांनी ती सुरूच ठेवली, आणि त्याच मांदियाळीमध्ये अतिशय वीर असलेले श्रीमंत पेशवे थोरले बाजीराव यांचा जो इतिहास आहे तो छत्रपतींच्या स्वराज्याचा आणि साम्राज्याला विस्तारित करण्याचा इतिहास असल्याचा आपल्याला पाहायला मिळतो. 19 व्या विसाव्या वर्षी पंतप्रधान पदाची सूत्र हातामध्ये घ्यायची आणि 20-21 वर्ष नुसतं लढत राहायचं. 41 लढाया एकाही लढाईमध्ये पराजय आला नाही आणि मुघल असो, निजाम असो, पोर्तुगीज असो सर्व प्रकारच्या शत्रूला नामोहरम करण्याचं काम हे थोरले बाजीराव यांनी केलं, असंही पुढे फडणवीस म्हणाले.


पश्चिमेमध्ये त्यांचा बोलबाला होताच, दक्षिणेमध्ये देखील साम्राज्याचा विस्तार झाला आणि अगदी उत्तरेला काबुलमध्ये, त्यानंतर बंगालपर्यंत सगळं पूर्व, पश्चिम, दक्षिण अशा त्याकाळच्या अखंड भारतामध्ये हिंदवी स्वराज्याची आणि मराठा साम्राज्याची स्थापना किंवा त्याचा विस्तार करण्याचं काम हे थोरल्या बाजीरावांनी केलं. त्यांच्यावर अतिशय कमी वयामध्ये शाहू महाराजांनी जो विश्वास टाकला होता त्या विश्वासाला सार्थ करण्याचं काम हे थोरल्या बाजीराव पेशव्यांनी केलेलं आहे. त्यांच्या लढाईच्या संदर्भात त्यांच्या रणनीतीचा संदर्भात अनेक गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात. त्यांच्या लढाईमध्ये सगळ्यात जास्त वेग ही त्यांची रणनीती असायची आणि जेव्हा मुघली साम्राज्याची सेना एका दिवसामध्ये आठ ते दहा किलोमीटर प्रवास करायची, त्यावेळी थोरल्या बाजीराव यांनी तयार केलेली सेना ही 60 ते 80 किलोमीटर एका दिवसात प्रवास करू शकायची, अशा प्रकारची सेना त्यांनी बनवली होती, अशीही माहिती फडणवीसांनी यावेळी बोलताना दिली आहे. एनडीएमधील कार्यक्रमात अमित शाह यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी अमित शाह यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होतं.


अमित शाह काय म्हणाले?


पुणेची भूमी स्वराज्याची उगम स्थान आहे. इंग्रजांच्या समोर लढण्याची वेळ आली तेव्हा लोकमान्य टिळकांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे म्हणत समोर आले. सावरकरांनी देखील पुढाकार घेतला. वातावरण चांगलं असल्याने NDA ची स्थापना केली असेल. पेशवा बाजीराव यांचं स्मारक बनवण्यासाठी सगळ्यात चांगली जागा NDA आहे. देशातील सैन्यात दाखल होणाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा ठिकाणी हा पुतळा आहे. प्रत्येकाला हा पुतळा प्रेरणा देईल आणि आणि दुश्मनांचं खात्मा करायला तयार असतील. युद्धात समर्पणाचा भाव आणि देशभक्तीचा आणि बलिदानाचा भाव सैन्याला विजय मिळवून देतो. 500 वर्षात या सगळ्या क्वॉलिटी बाजीराव पेशवे यांच्यात आहेत. बाजीराव पेशव्यांना पेशवा बनवण्याचा निर्णय झाला. त्यात 42 युद्ध लढले आणि एकही हरले नाहीत. शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची कल्पना केली असेल तेव्हा भूगोल आणि इतिहास पाहून 12 वर्षाच्या मुलाने हे कसं विचार केला असेल. मुघल साम्राज्य आणि उत्तर मध्य मुघल यांच्या यांच्यावरोधात आपल्याला मुक्त होण्याचं निर्धार केला. अनेकांनी स्वराज्याच्या ज्योतीला विझू दिलं नाही. स्वातंत्र्याची लढाई शिवाजी महाराजांनी सुरू केली नसती आणि पेशव्यांनी पुढे नेली नसती तर आज भारताचं स्वरुप असं नसतं, असंही पुढे अमित शाह यांनी म्हटलं आहे.