Pune Independance Day 2022: यंदा भारत स्वातंत्र्याचे 75 वर्ष (Azadi Ka Amrit Mahotsav) साजरे करत आहे. देशाला स्वतंत्र होवून 75 वर्ष झाले तरीदेखील भारतातील मुलभूत बाबींवर लक्ष देणं गरजेचं आहे. देशातील स्वच्छता ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. त्यासाठीच यंदा पुणेकरांनी (Pune) 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाचा भाग म्हणून दिवसभरात 75 जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित केले आहे. यात दोन स्वयंसेवी संस्थांचा समावेश आहे.  स्वच्छ आणि सारे जहाॅं से अच्छा या दोन संस्थेमार्फत स्वच्छ आणि सुंदर पुण्याचं स्वप्न साकारणार आहेत. या अंतर्गत कचरा गोळा करणे, सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण आणि वृक्षारोपण मोहीम हाती घेतले आहे.



गेल्या आठ वर्षांपासून निवृत्त विंग कमांडर पुनीत शर्मा हा उपक्रम राबवत आहेत.आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत कार्यक्रमाचे नाव PuneriSwag75@SwachhWay असं ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे SWAG चा एक अर्थही विचार करुन ठेवला आहे. S - स्वच्छ आणि सुशोभीकरण ड्राइव्ह, W -(Waste) कचरा संकलन आणि पुनर्वापर, A - (awareness) जागरूकता अभियानासाठी आणि G म्हणजे ग्रीन पुणे, अशी या संपुर्ण कार्यक्रमाची आखणी केली आहे.


बस स्थानक, रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण आणि मुळा मुठा नदीकाठी स्वच्छता मोहिमेसाठी एकूण 40 कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्लास्टिक, कपडे आणि ई-कचरा गोळा करण्यासाठी 12 केंद्र असतील. सारे जहाँ से अच्छा या स्वयंसेवी संस्थेतर्फे थुंकण्याविरुद्ध जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरातील सर्व टेकड्या व्यापणाऱ्या प्रत्येक जागेवर किमान 10 वृक्षारोपण मोहिमेसह किमान 75 रोपे लावली जातील, असं शर्मा यांनी सांगितलं आहे. जनजागृतीसाठी सायकलिंग आणि बाइकिंग फ्लॅश मॉब, पथनाट्य आणि रॅलीचे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातील, असंही ते म्हणाले.


या मोहिमेत दोन संस्थांच्या कार्यकर्त्यांनी शिवाय अनेक पुणेकरांनी पुढाकार घेतला आहे. 75 व्या स्वातंत्र्यदिनी प्रत्येक घरी तिरंगा फडकणार मात्र घराचा परिसरदेखील स्वच्छ ठेवणं सुजाण नागरीक म्हणून आपली जबाबदारी आहे. त्यामुळे अनेकांच्या सहभागातून दिवसभरात ही मोहीम पार पडणार आहे.