पुणे, इंदापूर : मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट देणं ताबडतोब थांबवा, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी इंदापूर येथील सभेत केली. मनोज जरांगे पाटील यांच्यावर यावेळी छगन भुजबळ यांनी हल्लाबोल केला.  आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देऊ नका, आमची इतर कोणताही मागणी नाही, असेही भुजबळ यावेळी म्हणाले. मराठ्यांकडे 20 टक्के , आमच्याकडे 80 टक्के मतं आहेत. ओबीसी समाजाला ( obc Reservation) 27 टक्के आरक्षण आहे. प्रत्येक जमातीला ब्रॅकेट आहे.  ओबीसी समाजाला सरकारी नोकऱ्या फक्त 9 टक्के मिळाल्यात.  आधी 27 टक्के जागा भरा मग इतर गोष्टी करा, असे म्हणत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे (manoj jarane patil) यांच्यावर टीकास्त्र सोडले.  इंदापूर (Pune Indapur) येथील सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. 


कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात जाती निहाय जनगणना झाली पाहिजे. त्यामध्ये अडचण काय आहे? बिहार करू शकते तर तुम्ही का जनगणना करीत नाही. मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्यायचे सुरु आहे ते थांबवा. न्यायमूर्ती शिंदे सगळीकडे जात आहेत आणि करून घेत आहेत. आमच्या 27 टक्केंतील आरक्षण दिले पाहिजे. पण ओबीसी मधून आरक्षण देता कामा नये. हे जर ऐकू कुणाला गेलं नाही, न्याय आपल्याला मिळाला नाही. तर पडळकर म्हणाल्याप्रमाणे सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है.. असंच करावे लागेल. 


विचार करणारा मराठा समाज गप्प का ? मराठा समाजाच्या मतांसाठी गप्प आहात का? मतं त्यांची आहेत, मग आमची नाहीत का? त्यांची लेकरं आहेत, मग आमची नाहीत का? असा सवाल यावेळी भुजबळांनी उपस्थित केला.  आरक्षण हा गरिबी हटावण्याचा कार्यक्रम नाही, असे भुजबळ म्हणाले.


आरक्षणावर अनेक नेते बोलायला तयार नाहीत. कसली भीती वाटते आहे? मतांची भीती वाटते का? त्यांच्याकडे मते आहेत आमच्याकडे नाहीत का? त्यांची 20 टक्के आणि 80 आमची आहेत. हर्षवर्धन पाटील, विजयसिंह पाटील तुम्हाला कुणबी सर्टीफिकेट पाहिजे आहेत का? सांगा ना पाहिजे का नाही? तळागाळातील लोकांना वरती आणले पाहिजेत, आमचे लोक गरिब का राहिले असते पण त्यांना काही काळतच नाही. आम्हाला 27 टक्के आरक्षण आहे. यात अनेक जाती आहेत. सरकारमध्ये फक्त आम्हाला 9 टक्के आरक्षण आहे. ते 27 टक्के भरा मग बाकीचे काही करा. लोकसेवा आयोगात 85 टक्के मराठा समाज आहे, सारथी, अण्णाभाऊ साठे, ews मधील 85 टक्के मराठा समाजाचे, कुणबी आहेत ते आमच्यात आहे. पंजाबराव देशमुख कृषी योजना त्यात मराठा समाज आहे, असे म्हणत भुजबळ यांनी सगळे गणीतच मांडले.