पुणे : राज्य सरकारने चौथा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर आता त्यासंबंधीची नियमावली जाहीर केली आहे. त्या अनुषंगाने पुण्यातील लॉकडाऊनमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील काही भागात पीएमपीएलच्या वाहतुक, मध्यवर्ती भागातील दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.


शेखर गायकवाड म्हणाले, पुण्यात यापूर्वी 69 प्रतिबंधीत क्षेत्र होते. यातील पाच झोन कमी झाले असून पुण्यात आता 64 कंटेन्मेंट झोन आहेत. यापूर्वी 69 प्रतिबंधित क्षेत्रातील 24 भागात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. त्यामुळे हे भाग आता रेड झोनमधून वगळण्यात आले आहेत. तर कोरोनाचा प्रभाव वाढलेल्या नवीन 19 भाग हे रेड झोनमध्ये टाकण्यात आले आहे. 10.48 चौरस मीटर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यासाठी घरकाम करणाऱ्या महिलांनाही आता परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय घरमालकाची परवानगी असेल तर घरकाम करणाऱ्या महिलांना कामावर जाण्याची परवानगीही देण्यात आली आहे. सोसायटी धारकांनी योग्य ती खबरदारी घेऊन घरकाम करणाऱ्या महिलांना काम करण्याची परवानगी द्यावी.


लॉकडाऊनमधून पुण्याच्या मध्यवर्ती भागातील दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता येथील दुकाने उघडण्यासही परवानगी देण्यात आलीय. कुठली दुकाने कधी उघडी राहतील यासंदर्भात नियमावली तयार करण्यात येत असून ती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.


पुण्यात बसची वाहतूक ही आतापर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी ठेवण्यात आली होती. परंतु आता लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शहरातील काही भागात पीएमपीएलच्या वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे.चौथ्या लॉकडाऊनमध्ये पुण्यातील छत्री, रेनकोट, घड्याळे, मौल्यवान धातू, बांधकाम क्षेत्राला साहित्य पुरवणारी दुकाने, शेती संबंधित दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आल्याचं गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.


Lockdown 4 Guidelines | लॉकडाऊन 4.0 च्या गाईडलाईन्सनुसार राज्यात काय सुरू आणि काय बंद?काय आहेत नियम?