Rohit Pawar : आई-वडिलांना आपण सगळेच देव मानतो. मात्र राजकीय नेत्यांना खुश करण्यासाठी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी (chandrakant patil) वक्तव्य केलं आहे. जर नेत्यांनाच खुश करायचं असेल तर अशा मोठ्या ठिकाणी नाही तर बंद खोलीत देखील त्यांना खुश करु शकतो, अशी जहरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar ) यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. 


आई-वडिलांना शिव्या देऊ हे पुढच्या पिढीसाठी घातक आहे. हा सगळा विषय संस्कृतीचा देखील आहे. त्यामुळे एखाद्या राजकीय नेत्यांने तोंडावर ताबा ठेवला पाहिजे, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. आई-बापाला शिव्या द्या मात्र मोदी शहांना शिव्या देऊ नका, असं वक्तव्य  पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं, त्यानंतर अनेकांनी यावरुन त्यांच्यावर टीका केली होती. 


'राजीनामा नाकरण्यात राजकारण सुरु आहे'
मागील महिन्यात ऋतुजा लटकेंनी राजीनामा दिला होता. त्या प्रकरणाला तीस दिवस उलटून गेल्याने त्यांनी परत राजीनामा दिला. मात्र त्यांचा राजीनामा मंजूर केला जात नाही आहे. या मागे कदाचित राजकारण असावं, कोर्ट काय निर्णय देतो यावर सगळी गणितं ठरतील, असं देखील त्यांनी म्हटलं आहे


'संघर्ष करणं हाच उपाय'
व्यक्तीवर झालेल्या अन्यायावर संजय राऊतांनी पत्रात लिहिलं आहे. त्यांच्या आईला उद्देशून त्यांनी हे पत्र लिहिलंय मात्र काहीही असलं तरीही संघर्ष करणं गरजेचं आहे. संघर्ष करताना लोकांना विश्वासात घेऊन, मोठी ताकद लावून लढावं लागेल, असंही त्यांनी पत्रात लिहिलं आहे. त्यात सोनिया गांधींचा ही उल्लेख केला आहे. मात्र युवा पिढीच्या मदतीने आम्ही संघर्ष करु आणि ज्या गोष्टी खटकतील त्यांवर प्रश्न विचारु, असंदेखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


'निवडणुका व्हायला हव्या होत्या'
महापालिकेच्या आणि नगरपरिषदेच्या निवडणुका आतापर्यंत व्हायला हव्या होत्या. मात्र या निवडणुका खोळंबल्याचं चित्र आहे. निधी मंजुरीबाबत देखील अनेक चर्चा सुरु आहे. मात्र या सगळ्या गोष्टी लोकशाहीला धरुन नाहीत. त्यामुळे नेत्यांचा आणि सामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 


चारशे टक्के फी वाढ अन्यायकारक 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून फी वाढीच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हजेरी लावली होती. चारशे टक्के फी वाढ अन्यायकारक आहे. ती कमी झालीच पाहिजे. या विद्यापीठात शेतकऱ्यांची आणि सामान्यांची मुलं शिक्षण घेत आहे. त्यांना योग्य शिक्षण द्याव त्यासोबत फी वाढ कमी करावी, असं म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आहे.