Chandrakant patil : शाईफेक प्रकरणानंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आता सावध भूमिका घेतली आहे. पुन्हा शाईफेकीची धमकी आल्यानं चंद्रकांत पाटलांनी सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होताना फेस शिल्डचा वापर केला आहे. फेस शिल्ड लावत ते पवनाथडी जत्रेच्या उद्घाटनाला हजर झाले. सकाळीच त्यांना सोशल मीडियावरुन पुन्हा एकदा शाईफेकीची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांनी फेस शिल्डचा वापर केला आहे. त्यांच्या या फेस शिल्डची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
पुण्यात दरवर्षी पवनाथडी जत्रा भरते. या जत्रेत अनेक लहान मोठे उद्योग एकत्र येत ग्रामीण आणि शहरी संस्कृतीचं पुणेकरांना दर्शन घडवतात. याच जत्रेचं उद्घाटन करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी आज हजेरी लावली. मात्र सकाळीच त्यांना सोशल मीडियावर शाईफेकीची धमकी आली होती. दोन व्यक्तींनी फेसबुक पोस्ट करत ही धमकी दिली होती. त्यांच्यावर सांघवी पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. मात्र दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं नसल्याने शाईफेक होण्याची शक्यता होती. यामुळे चंद्रकांत पाटलांनी खबरदारी म्हणून फेस शिल्ड लावत उद्घाटन केलं.
नगरसेवकाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल
'आज पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार? मुक्काम पोस्ट सांगवी.' पत्रकार मित्रांनो आज पण चांगला अँगल घ्या. पवना थडी जत्रा, अशा आशयाची फेसबुक पोस्ट टाकण्यात आलेली होती. ही फेसबुक पोस्ट करणाऱ्या विकास लोले आणि दशरथ पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे माजी नगरसेवक हर्षल ढोरे यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. विकास लोले हा चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाचा अध्यक्ष असल्याचा दावा ढोरे यांनी केला आहे.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
पवना थडी जत्रेचं उद्घाटनाच्या वेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सांघवीच्या साई चौकापासून तर कृष्णा चौकापर्यंत पोलिसांच्या ताफा तैनात करण्यात आला होता. पवनाथडी जत्रेत अनेक लहान मोठे स्टॉल्स असतात. या प्रत्येक स्टॉल्स समोर एक पोलीस तैनात करण्यात आले आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक बंदोबस्त तैनात ठेवला आहे. शिवाय मागील काही दिवसांपासून त्यांच्या सुरक्षेतदेखील वाढ करण्यात आली आहे. फेस शिल्ड लावून त्यांनी प्रत्येक स्टॉलची पाहणी केली. उद्घाटनाच्या वेळी अनेक नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.