Chandrakant patil : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil News) यांच्यावर पुन्हा शाई फेक करण्याची धमकी देण्यात आली आहे. फेसबुकवर अशी धमकी देणाऱ्या दोघांवर पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील आज पिंपरी चिंचवडमधील पवना थडी जत्रेचं (Pavna Thadi) उद्घाटन करायला सायंकाळी पाच वाजता सांघवीत येणार आहेत. त्यावेळी तणावाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. 


काय आहे फेसबुक पोस्ट?


 'आज पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार? मुक्काम पोस्ट सांगवी.' पत्रकार मित्रांनो आज पण चांगला अँगल घ्या. पवना थडी जत्रा, अशा आशयाची फेसबुक पोस्ट टाकण्यात आलेली आहे.  ही फेसबुक पोस्ट करणाऱ्या विकास लोले आणि दशरथ पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे माजी नगरसेवक हर्षल ढोरेने याप्रकरणी सांगवी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. विकास लोले हा चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाचा अध्यक्ष असल्याचा दावा ढोरे यांनी केला आहे. चंद्रकांत पाटील आज पवना थडी जत्रेचं उद्घाटन करणार आहेत. यावेळी गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे फेसबुक पोस्ट करणाऱ्यांना अद्याप सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाही, त्यामुळे आज पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. द्वेष भावना पसरविणे आणि धमकी देणे याबद्दल 152, 505 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांचा मोठा बंदोबस्त
पवना थडी जत्रेचं उद्घाटन करण्यासाठी चंद्रकांत पाटील जाणार आहेत. त्यामुळे जत्रेच्या ठिकाणी आणि त्यांच्या जाण्याच्या मार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे . शिवाय मागील काही दिवसांपासून त्यांच्या सुरक्षेतदेखील वाढ करण्यात आली आहे. 


चिंचवडमध्ये यापूर्वी झाली होती शाईफेक
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे शिवप्रेमी आक्रमक झाले होते. त्यांच्यावर समता दलाच्या कार्यकर्ता मनोज गरबडेनं चिंचवडमधील एका कार्यक्रमापूर्वी शाईफेक केली होती. त्यानंतर गोंधळांचं वातावरण निर्माण झालं होतं.  शाईफेक करणाऱ्या समता दलाच्या तरुणाला अटक करण्यात आली होती. शिवाय मनोज गरबडेह तिघांविरोधात गुन्हेदेखील दाखल करण्यात आले होते. 


वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी चंद्रकांत पाटलांनी पुन्हा दिलगिरी व्यक्त केली होती आणि या सगळ्यांवरील कारवाई मागे घेण्याच्या सूचना दिल्या होत्या . त्यानंतर आता पुन्हा त्यांच्यावर शाईफेकीची सोशल मीडियावरुन धमकी आल्यामुळे सगळीकडे कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे आणि धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.