पुणे : पुण्यातील चांदणी चौकाच्या उड्डाणपुलाचं लोकार्पण (Chandani Chawk Flyover)  करण्यात आलं. यावेळी नितिन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. चांदणी चौकातील वाहतुकीस अडथळा पूल मागच्या वर्षी पाडण्यात आला होता. त्याच ठिकाणी हा मोठा प्रकल्प उभा राहिला आहे. 2017 ला या चांदणी चौकातील प्रकल्पाचं उद्घाटन झालं होतं. मात्र 26 ऑगस्ट 2022 ला स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच या चांदणी चौकातील वाहतूक कोंडीत अडकले. त्यांनी थेट वाहतुकीस अडथळ असलेला हा पुल पाडण्याचा आदेश दिला होता आणि त्यानंतर वर्षभरातच या प्रकल्पाला गती मिळून आज या पुण्यातील सर्वात मोठ्या मानल्य़ा जाणाऱ्या प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलं. त्यावेळी नितिन गडकरींचा फोनवरुन सल्लाही घेतला होता. मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते मात्र त्यांच्यामुळेच या जुना पूल पाडून हा नवा प्रकल्प उभारायला खरी गती मिळाली, असं म्हणायला हरकत नाही. 


मुख्यमंत्री अडकले अन् पुणेकरांनी घेरलं...


26 ऑगस्ट 2022 ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर दुसऱ्यांदाच त्यांच्या दरे या मुळगावी निघाले होते. त्यावेळी याच चांदणी चौकात मुख्यमंत्र्यांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला होता. त्यानंतर याच वाहतूक कोंडीत अडकलेल्या अनेक पुणेकरांनी थेट मुख्यमंत्र्यांना घेरलं आणि चांदणी चौकातील या वाहतूक कोंडीचं गाऱ्हाणं मांडलं होतं. पुणेकरांना रोज चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेक नागरीकांचा वेळ वाया जातो, असं म्हणत मुख्यमंत्र्यांना चांदणी चौकातील वाहतूक कोंडीवर पर्याय काढा, असं निवेदन दिलं होतं. 


यापूर्वीही अनेक मंत्री, आमदार, खासदार यांनी या चांदणी चौकातून प्रवास केला होता. तेदेखील अनेकदा या चांदणी चौकातील वाहतूक कोंडीत सापडले असावे, मात्र मुख्यमंत्री वाहतूक कोंडीत सापडले आणि त्यांनी पुणेकरांचं गाऱ्हाणं ऐकलं आणि एका रात्रीत त्यांनी हा पूल पाडण्याचे आदेश दिले होते. दुसऱ्या दिवशी दरे गावाहून मुंबईला परत जाताना त्यांनी चांदणी चौकात या पुलाच्या आणि रस्त्यांच्या संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं आणि पूल कसा पाडता येईल?, यावर मार्ग सुचवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा आदेश मनावर घेतला आणि उपाययोजना आखल्या होत्या. अखेर पुण्यातील चांदणी चौकातील 1 ऑक्टोंबरला पूल मध्यरात्री ठीक 1 वाजून 7 मिनिटांनी पाडण्यात आला. 


Edifice engineering या कंपनीची निवड


पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यासाठी Edifice engineering या कंपनीची NHAI ने निवड केली होती.  ज्या कंपनीकडून काही दिवसांपूर्वी नोएडातील ट्विन टॉवर्स पाडण्यात आले होते त्याच कंपनीकडे हा पूल पाडण्याचं काम सोपवण्यात आलं होतं. हा पूल 10 सेकंदात पाडण्यात आला होता. 


1992 साली बांधला अन् 2022 ला जमिनदोस्त केला...


पुण्यातील जमिनदोस्त केलेला  चांदणी चौकातील  पूल 1992 साली PWDच्या मार्फत बांधण्यात आला होता. त्यावेळी पुणेशहराचा विकास फारसा झाला नव्हता. चांदणी चौकातील पूल हा शहराच्या विकासाचा आणि वाहतूकीसाठी महत्त्वाचा ठरणार होता. त्यामुळे हा पूल बांधण्याचं काम बारली या कंपनीकडे सोपवण्यात आलं होतं. सतीश मराठे हे चांदणी चौकातील पूल बांधणारे इंजिनिअऱ होते. चांदणी चौकातील पूल बांधताना मजबूत पूल बांधा, असं मराठे यांना सांगण्यात आलं होतं. त्यावरून एनडीएचे 70 टनांचे रणगाडे जातील, इतकी त्या पुलाची क्षमता ठेवा, असंदेखील स्पष्ट  मराठे यांना आलं होतं. हे सगळं चित्र डोळ्यासमोर ठेवूनच तो पूल डिझाईन केला होता.सतीश मराठे आणि त्यांचे भागीदार मित्र अनंत लिमये यांनी ही कंपनी सुरु केली होती. दोघांंनीही कत्रांट घेण्याचं काम सुरु केलं होतं. 1992 साली केंद्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या पूलाचं कंत्राट त्यांना दिलं होतं. 


 पूल पाडण्यावरुन जोक्स व्हायरल...


हा पूल पाडण्यावरुन पुणेकरांनी बरेच जोक्स व्हायरल केले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची गरज नव्हती, मनात आलं असतं तर पुणेकरांनी आपल्या टोमण्यांनीच हा पूल पाडला असता, मोजून 4 मीटरचा चांदणी चौक पुल पाडायचाय ..आव तर असा आणलाय जशी काही चीनची भिंत पाडणार आहेत, असे जोक्स त्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


History of Chandani Chawk Flyover Name: पुण्यातील चांदणी चौकाला 'चांदणी चौक' नाव कसे पडले? अजित पवारांनी सांगितला इतिहास...