पुणे : राज्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर कमी होऊन, राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट आलं आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात घाटमाथा आणि परिसरात पुढील तीन दिवस मेघगर्जना, वादळी वारे, विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. दरम्यान, सकाळी विरळ धुकेही पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यभरात दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे शहर परिसरासह घाटमाथ्यावर अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. सकाळच्या सुमारसात काही प्रमाणात धुकेही पडत असल्याचं दिसून येत आहे. 29 डिसेंबरपासून अवकाळी पाऊस थांबेल, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
राज्यात पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस
राज्यात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.पुणे, मध्य महाराष्ट्र, पाऊस हजेरी मराठवाडा, विदर्भात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागातील थंडी कमी झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. असे असले तरी सकाळी दाट धुकेही पडेल, असेही हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या बंगालच्या उपसागरापासून ते उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिण भागाकडून महाराष्ट्राकडे बाष्पयुक्त वारे वाहू लागलेले आहेत. परिणामी राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे.
असे आहेत यलो अलर्ट
27, 28,29 डिसेंबर रोजी राज्यातील या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने अलर्ट दिला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक (घाटमाथा), अहिल्यानगर, पुणे, पुणे (घाटमाथा), छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलडाणा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ.