पिंपरी चिंचवड : गुन्हेगारांना तत्परतेने अटक करणारे पिंपरी चिंचवडचे पोलीस गुन्हे दाखल झालेल्या भाजप नगरसेवकांपर्यंत पोहचू शकत नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आत्तापर्यंत विविध गुन्ह्यांमध्ये भाजपच्या चार नगरसेवकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र काही जामिनावर बाहेर आहेत, तर काही पोलिसांना मिळत नाहीत.

गुन्हे दाखल झालेले नगरसेवक

क्रीडा सभापती आणि भाजप नगरसेवक संजय नेवाळे - तीन जून म्हणजेच रविवारच्या रात्री दुकानाची तोडफोड केल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

भाजप नगरसेविका सुजाता पालांडे - फेब्रिकेटरला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 28 मे रोजी पिंपरी पोलिसांनी पालांडे पती-पत्नीवर गुन्हा दाखल केला.

भाजप नगरसेवक तुषार कामठे - निवडणुकीत बनावट कागदपत्र दिल्याप्रकरणी गेल्या नोव्हेंबरमध्ये सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

भाजप नगरसेवक तुषार हिंगे - विरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या दोघांना पोलीस चौकीसमोरच मारहाण केली. निगडी पोलिसांनी ऑक्टोबर 2017 मध्ये गुन्हा दाखल केला.

... तर मग इतरांना वेगळा न्याय का?

गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकांपैकी कामठे जामिनावर बाहेर आहेत. तर तुषार हिंगेवर निगडी पोलीस मेहरबान झाल्याने त्याला अटकपूर्व जामीन मिळवण्यात यश आलं.

आता पालांडे आणि नेवाळेही पोलिसांच्या हाती लागेनात. इतर आरोपींप्रमाणेच त्यांचा तपास केला जातोय. फक्त काही आरोपी सापडतात आणि काही सापडत नाहीत, असं म्हणून पोलीस वेळ मारुन नेत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांना एक न्याय आणि इतर आरोपींना वेगळा का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.