पुणे : धमकी, शिवीगाळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पुण्यातील भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल झाला आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्यात स्थानिक भाजप नगरसेवक आनंद रिठे यांच्यावर गुन्हा दाखल आहे.
आनंद रिठे यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून संजय सुर्वे या इसमाने गळफास घेत आत्महत्या केली होती. आत्महत्या केलेल्या संजय सुर्वे यांनी दत्तवाडी येथील इमारतीवर अनधिकृत टॉवर उभा केल्याची तक्रार नगरसेवक आनंद रिठे यांनी महापालिकेत केली होती. नगरसेवक आनंद रिठे हे कारवाईची भीती दाखवून वेळोवेळी पैशाची मागणी आणि धमकी देत असल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलिसांत केली आहे.
संजय सुर्वे आणि आनंद रिठे यांच्यातील संवादाची ऑडिओ क्लिप देखील समोर आली आहे. पुण्यातील या नगरसेवकावर गंभीर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.