पुणे : ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचं सोमवारी रात्री वृद्धापकाळानं निधन झालं. पुण्यातील राहत्या घरी 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नुकतंच त्यांच्या व्यंगचित्रांचं प्रदर्शन पुण्यात भरवण्यात आलं होतं. शेवटच्या दिवसांमध्येही त्यांचं व्यंगचित्र काढणं सुरुच होतं. 1954 मध्ये त्यांनी पहिलं व्यंगचित्र काढलं होतं. त्यांनी आपल्या मृत्यूवरही व्यंगचित्र काढलं होतं.


मंगेश तेंडुलकरांनी व्यंगचित्रांसोबतच काही विनोदी पुस्तकांचं लिखाणही केलं आहे. त्यांची व्यंगचित्र आणि ललित लेख विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. मंगेश तेंडुलकरांच्या व्यंगचित्रांची प्रदर्शनं अनेकवेळा भरली आहेत. त्यांच्या प्रत्येक प्रदर्शनाला आणि व्यंगचित्राला रसिकांनी खुल्या मनानं दाद दिली. त्यांच्या हस्ते पुस्तकांची उद्‌घाटनंही झाली आहेत. मंगेश तेंडुलकर एक चांगले व्याख्याते म्हणूनही सुपरिचित होते.

मंगेश तेंडुलकरांवर आज दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्याआधी अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव राहत्या घरी ठेवण्यात येणार आहे.

मंगेश तेंडुलकरांचं साहित्य

भूईचक्र

संडे मूड (यात 53 लेख आणि तेवढीच व्यंगचित्र)

वर्तमान पत्रांमधून प्रसिद्ध झालेले लेख

अतिक्रमण

कुणी पंपतो अजून काळोख...

’बित्तेशां?' 'दांकेशां!'

पुरस्कार

संडे मूड’ पुस्तकासाठी सावानाचा वि.मा.दी. पटवर्धन पुरस्कार

मसापचा चिं.वि. जोशी पुरस्कार