Mahayuti Cabinet Expansion : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारचा रविवारी(15 तारखेला) पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. भाजपाच्या 20 शिवसेनेच्या (शिंदे) 12 व राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे. महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. तर काही माजी मंत्र्यांना डच्चू देण्यात आला. त्यानंतर मंत्रिमंडळाचे खातेवाटपाची प्रतीक्षा होती, ते काल (शनिवारी) अखेर पार पडलं. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये 4 महिला मंत्र्यांनी शपथ घेतली होती त्यांच्यावरती देखील मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपकडून पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर यांना संधी देण्यात आली.तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिती तटकरे यांना मोठी जबाबदारी दिली आहे. एकनाथ शिंदेंकडून एकाही महिला आमदाराला मंत्रिपदाची संधी देण्यात आलेली नाही.
लाडक्या बहिणींवर महत्त्वाची जबाबदारी
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये पंकजा मुंडे, आदिती तटकरे, माधुरी मिसाळ व मेघना बोर्डीकर या महिला आमदारांचा समावेश आहे. या लाडक्या बहिणींवर खातेवाटपात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. कॅबिनेट मंत्री असणाऱ्या पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण, हवामान बदल आणि पशुसंवर्धन या खात्याची जबाबदारी असणार आहे. महिला व बालविकास खात्याची जबाबदारी आदिती तटकरे यांच्यावर असणार आहे. तर राज्यमंत्री असणाऱ्या माधुरी मिसाळ यांच्यावर नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास या खात्यांची तसेच मेघना बोर्डीकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
विधानसभेत एकूण 21 महिला आमदार निवडून आल्या आहेत. यामध्ये भाजपाच्या 14, अजित पवार गटाच्या चार, एकनाथ शिंदे गटाच्या दोन, तर काँग्रेसच्या एक महिला आमदाराचा समावेश आहे. महायुती सरकारमधील एकूण 42 मंत्र्यांमध्ये 4 महिलांना मंत्रीपद मिळालं आहे. म्हणजेच केवळ 10 टक्के महिला मंत्री आहेत. भाजपच्या आमदार पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्याआमदार आदिती तटकरे यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला आहे. पंकजा मुंडे या विधानपरिषदेवर निवडून गेल्या होत्या. तर मेघना बोर्डीकर जिंतूर मतदारसंघातून दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आल्या आहेत. तसेच माधुरी मिसाळ या चौथ्यांदा पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडून गेल्या आहेत.
पुणे जिल्ह्यातील मंत्र्यांकडे जबाबदारी
कॅबिनेट
उपमुख्यमंत्री अजित पवार : अर्थ, नियोजन आणि राज्य उत्पादन शुल्क
आमदार चंद्रकांत पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
आमदार दत्तात्रय भरणे : क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास
राज्यमंत्री
माधुरी मिसाळ : नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास