Girish Bapat : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पुणे दौऱ्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. किरीट सोमय्या यांना पुणे महापालिकेच्या ज्या पायऱ्यांवर शिवसैनिकांकडून धक्काबुक्की करण्यात आली होती. त्याच पायऱ्यांवर भाजपने शुक्रवारी सत्कार केला. सोमय्या यांचा सत्कार झाल्यानंतर पुणे काँग्रेसकडून त्या पायऱ्या गोमूत्राने साफ करण्यात आल्या. या प्रकरणानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. या पत्रकार परिषदेला भाजपचे खासदार गिरीश बापटही उपस्थित होते. यावेळी बोलताना बापट यांनी काँग्रेससह ठाकरे सरकावर निशाणा साधला. काँग्रेसवाले आज गोमूत्र घेऊन महापालिकेत गेले आहेत. पण त्यांना उद्या गोमाता घेऊन जावे लागेल, अशी टीका बापट यांनी केली. . 


काँग्रेसवाले गोमूत्र घेऊन गेले की वाईन, हे तपासावे लागले. कदाचित वाईन घेऊन तिथे गेले असतील. मला इथपर्यंत वास येत आहे, मी फक्त वासावर आहे, पित नाही कधी, असे बापट म्हणाले. यापुढे बोलताना बापट म्हणाले की, संजय राऊतपासून अनेक जण म्हणत असतील या किरीट बाबाला तुम्ही यूपीत का नाही पाठवलं? पण अनेक अखिलेश इथं देखील आहेत. त्यांची वाट लावण्याचं काम सोमय्या करत आहेत. आपली ही लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधातील आहे. किरीट सोमय्या यांचे नाव किरीट नाहीतर स्पिरिट आहे. भाजपने पुणे शहराच्या इतिहासात सर्वाधिक चांगलं काम केले आहे. जे दगड आहेत त्यांची संस्कृती दगडाची आहे. आपली संस्कृती पाणी देण्याची आहे, असे बापट म्हणाले. 


काँग्रेसकडून शुद्धीकरण - 
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा सत्कार झाल्यानंतर  कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी येथे येत स्मृतिस्थळ गोमुत्र शिंपडून त्याचे शुद्धीकरण केले.  किरीट सोमय्या यांच्या येण्याने हा परिसर अशुद्ध झाला होता, असे काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले.  कॉंग्रेसचे कार्यकर्ते सचिन कारेकर यांनी गुलाबपाणी आणि गोमुत्र शिंपडून पायऱ्यांचे शुद्धिकरण केले. पुणे महानगरापिलकेत भाजप सत्तेत आहे. पुण्यातील रस्ता, खड्डयाचे, आरोग्याचे प्रश्न सोडून भाजपला सोमय्यांचा सत्कार करणे महत्त्वाचे वाटते. त्यामुळे आम्ही भाजपच्या संस्कृतीप्रमाणे या पायरीचे शुद्धिकरण  केली. पुणेकर कोणत्याही राजकरणात पडणार नाही. ज्या पद्धतीने भाजप काम करत आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही या पायरीचे शुद्धीकरण केले आहे. 


  कोविड कंपनी बोगस, आयुक्तांनी केलं मान्य – सोमय्यांचा दावा
कोविड कंपनी बोगस असल्याचे पुणे आयुक्तांनी मान्य केलं आहे. त्यामुळे 10 दिवसांपासून एकही डॉक्टर आणलेला नाही. या काळात अनेक रुग्णांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी पीएमआरडीएला पत्र पाठवले. तसेच कोविड कंपनीला ताबडतोब बरखास्त करा, अशी मागणी या पत्रातून केली आहे. हा रिपोर्ट आल्यानंतरही पीमएमआरडीएने 9 दिवस लागले. याकालावधीत तीन रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर पीमएमआरडीएने ही कंपनी बोगस असल्याचे सांगत करार रद्द केला. तसेच यापुढे महाराष्ट्रात या कंपनीला जागा मिळणार नाही, असे सांगितले. त्यानंतरही या कंपनीला अनेक काँट्रॅक्ट मिळाली. बीएमसीनेही तब्बल 76 कोटी रुपयांचे काँट्रॅक्ट या कंपनीला दिले. महापौर आणि आयुक्तांनी ही कंपनी बोगस असल्याचे मान्य केलं आहे. कारवाई झाल्याशिवाय शांत बसणार नाही. या कंपनीच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करणार आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले. कंपनी बोगस आहे तर कारवाई का केली नाही? असा प्रश्नही सोमय्या यांनी उपस्थित केला.