पुणे : भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीने बिल्डरला मारहाण केली. पिंपरी चिंचवड महापालिकेत सर्वांसमोर हा प्रकार घडला आहे. लाथा-बुक्क्यांनी केलेल्या मारहाणीचा सीसीटीव्ही (CCTV Footage Video) ही समोर आला, त्यामुळं आमदार महेश लांडगे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. वाढती नाराजी पाहता लांडगे (mahesh landage) यांनी पटेल समाजाची माफी मागितली आणि लवकरच नितीन बोऱ्हाडे आणि बिल्डर नरेश पटेलांचा वाद मिटवेन, असं आश्वासन ही आमदार लांडगे यांनी दिलं.
नितीन बोऱ्हाडे यांचे चुलते आणि नरेश पटेल यांची जमीन एकमेकांना लागून आहे. त्या जमिनीतून जाणाऱ्या डीपी मार्गावरून हा वाद सुरू होता. या वादाची सुनावणी पालिकेत झाली आणि त्यानंतर बोऱ्हाडे यांनी पटेलांना मारहाण केली. नितीन बोऱ्हाडे हे आमदार लांडगे यांचे कट्टर समर्थक आहेत, त्यामुळं या मारहाणीनंतर लांडगे अडचणीत आले होते. ही अडचण दूर करण्यासाठी थेट आमदारांनी पटेल समाजाची माफी मागितली आणि प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
नेमकं काय घडलं होतं?
पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाच्या माजी नगरसेविकेच्या पतीने एका बिल्डरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली होती. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही कैद झाला होता. महापालिकेत राडा घालणारे नितीन बोऱ्हाडे हे भाजप आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक आणि माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांचे पती आहेत. त्यांनी बिल्डर नरेश पटेलांवर सर्वांदेखत हात उचलण्याचा पराक्रम केला होता.
नितीन बोऱ्हाडे यांचे चुलते आणि नरेश पटेलांची बोऱ्हाडेवाडीत जमीन आहे. सर्व्हे नंबर 644 मध्ये दोघांची जमीन एकमेकांना लागून आहे. त्याच जमिनीतून डीपी मार्ग जातो, त्यावरून दोघांमध्ये वाद सुरुयेत. त्याची सुनावणी महापालिकेत होती. त्या सुनावणीनंतर नितीन बोऱ्हाडे आणि नरेश पटेलांमध्ये वाद झाले. यातून नितीन बोऱ्हाडे यांनी आधी पटेलांच्या कानशिलात आणि नंतर लाथ ही मारली होती. पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी बोऱ्हाडे यांना रोखलं आणि प्रकरण तिथंच निवळलं होतं. पण हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. 'तुम्ही न्यायालयात जा अथवा कुठं ही जा, मला फरक पडत नाही', असं नरेश पटेल माझ्या चुलत्याला बोलले. हे अशोभनीय होतं, त्याच रागात हे घडलं, असं मारहाणीनंतर नितीन बोऱ्हाडे यांनी स्पष्टीकरण दिलं. तर मी असं काहीच बोललो नाही, उलट डीपीनुसार मार्ग होऊ द्या. त्यानुसार झाल्यास मलाच फायदा होणार होता. त्यामुळं बोऱ्हाडे यांनीच न्यायालयात जाण्याची भाषा वापरल्याचा दावा नरेश पटेलांनी केला होता.
इतर महत्वाची बातमी-