पुणे : 'किमान शब्दात कमाल अपमान' असं पुणेकर आणि पुणेरी पाट्यांबद्दल मजेत म्हटलं जातं. देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या अतिशय खोचक, नेमक्या आणि शब्दात असलेल्या पाट्या सगळ्याचं लक्ष वेधून घेतातच. पण आता पुण्यातील काही बॅनर देखील सगळ्यातं लक्ष आपल्याकडे वळवून घेतलं आहे. कारण हे बॅनर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे. पुण्यातील कोथरुड भागात काही अज्ञातांनी स्थानिक आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे बॅनर लावले आहेत. 'दादा परत या', 'हरवले आहेत' अशा आशयाचे हे बॅनर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहेत. 


एका बॅनरमध्ये चक्क चंद्रकांत पाटील यांचा फोटो लावून 'हरवले आहेत' असा उल्लेख देखील करण्यात आला आहे. "पुणे शहरातील कोथरुड मतदारसंघातील आमदार चंद्रकांत पाटील हे गेल्या महिन्याभरापासून हरवले आहेत. कोणाला सापडल्यास कृपया संपर्क साधावा. समस्त कोथरुडकर,"असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे.


'दादा परत या' असा उल्लेख केलेल्या बॅनरवर लिहिलं आहे की, "दादा, एक महिना झाला तुमचा शोध कुठेच लागत नाही, आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही. तुम्ही जिथे कुठे असाल तिथून परत या, आम्ही तुमची वाट पाहतोय. समस्त कोथरुडकर."


चंद्रकांत पाटील कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत व्यस्त
भाजपकडून कोथरुड मतदारसंघातून निवडणूक लढवून विजयी झालेले चंद्रकांत पाटील सध्या कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत व्यस्त आहे. ते सध्या कोथरुडमध्ये नाहीत, कोल्हापुरातच ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड परिसरात एखाद्या हरवलेल्या व्यक्तीच्या बॅनर किंवा पोस्टर जरा मजकूर लिहितात तसा मजकूर लिहित चंद्रकांत पाटील यांचा फोटो असलेले बॅनर लावण्यात आले आहेत. पण हे बॅनर नेमके कोणी लावले याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.


चंद्रकांत पाटील कोथरुडचे आमदार
दरम्यान, मूळचे कोल्हापूरचे असलेले चंद्रकांत पाटील हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोथरुड मतदारसंघातून लढले आणि विजयी झाले. खरंतर सुरुवातीला कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील यांचा पुण्यातील कोथरुडमधून उमेदवारी देण्याला विरोध झाला होता. परंतु हा विरोध झुगारुन त्यांना उमेदवारी दिली आणि ते विजयी देखील झाले.