Kirit Somaiyya on Ajit Pawar : भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरून विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा वारंवार इशारा देणारे भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी तुरुंगाच्या भाषेवर यु-टर्न घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार तुरुंगात जाणार हा एक शब्दप्रयोग आहे. तुरुंगात जाणं म्हणजेच कारवाई होणे. सर्वांना तुरुंगात टाकणं शक्य नाही. असे म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अक्षरशः यु टर्न घेतला. भाजपचाच अजित पवारांना पाठिंबा आहे का? असा प्रश्न पिंपरी चिंचवडमधील पत्रकार परिषदेत सोमय्या यांना विचारण्यात आला. तेव्हा तुरुंगात जाणार या वक्तव्याकडे शब्दप्रयोग म्हणून पाहा असे म्हणत तुरुंगात जाणे म्हणजेच कारवाई होणे आणि अशी कारवाई झाल्यावर तुम्ही माझं कौतुक तरी करा, असे उलट आवाहन त्यांनी केले. 


भाजप नेते किरीट सोमय्या पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आहे. या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात भाजपचे सरकार असताना किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि तत्कालिन काँग्रेस नेत्यांवर आरोपांची राळ उठवली होती. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह इतर काही नेते तुरुंगात जाणार असल्याचा इशारा त्यांनी वारंवार दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना ईडीने अटक केल्यानंतर सोमय्या यांच्या आरोपांची धार वाढली होती. काही वर्षांपूर्वी अजित पवार यांची दिवाळी तुरुंगात जाणार असल्याचे वक्तव्यही सोमय्या यांनी केले होते. राज्याच्या सत्तेतून नाट्यमयरीत्या भाजप पायउतार झाल्यानंतर सोमय्या यांच्याकडून विरोधी नेत्यांवर आरोपांच्या फैऱ्या झडू लागल्या. विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार तुरुंगात जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. आज मात्र, त्यांनी तुरुंगात जाण्याच्या शब्दावरून यु-टर्न घेतला आहे. सर्वांना तुरुंगात टाकणे शक्य नाही. त्यामुळे तुरुंगात जाणे म्हणजे कारवाई होणे असा त्याचा अर्थ असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले.  


नांगरे पाटील यांना पोलीस दलातून मुक्त करावे 


जालना साखर कारखान्यात खोतकर आणि मुळ्ये परिवाराने घोटाळा केलाय. यात मुंबईतील सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नींचा ही समावेश आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी आणि तोपर्यंत नांगरे पाटील यांना पोलीस दलातून मुक्त करावे अशी मागणी ही सोमय्या यांनी केली.


शिवसेनेची सोमय्यांविरोधात निदर्शने
 
पिंपरी चिंचवडमध्ये आलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांची वाट अडविण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला. शहरातील भाजप कार्यालयात पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा आणि पत्रकार परिषद घेऊन सोमय्या परतत होते. तेव्हा अचानक शिवसैनिक तिथे पोहचले. त्यांनी काळे झेंडे दाखवत गेट समोर ठिय्या मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी सोमय्या यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.  सोमय्या विरोधात शिवसेना या आधी ही आक्रमक झाली आहे.