पुणे: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उद्या (सोमवारी दि. १४) पुण्यातील महत्त्वाच्या रस्त्यांवरील वाहतुककीत बदल करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच लष्कर भागातील अरोरा टॉवर्स, दांडेकर पूल, विश्रांतवाडी भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी शहर परिसरातून मोठ्या संख्येने अनुयायी येत असतात. या भागात होणारी मोठी गर्दी विचारात घेऊन वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केलं आहे. मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकाकडून मालधक्का चौकाकडे येणारी वाहतूक वळवण्यात येणार आहे. या भागातून जाणाऱ्या वाहन चालकांनी आरटीओ चौक, जहांगीर रुग्णालय या मार्गाने इच्छित स्थळी जावे. आरटीओ चौकातून मालधक्क्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी ताडीवाला रस्ता, जहांगीर रुग्णालयामार्गे जावे.
तसेच मुख्य टपाल कार्यालयाकडून (जीपीओ) जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी वाहतूक वळवण्यात येणार आहे. या भागातून जाणाऱ्या वाहनचालकांनी किराड चौक, नेहरू मेमोरिअल चौकमार्गे इच्छित स्थळी जावे. पुणे स्टेशनकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी वाहतूक वळवण्यात येणार आहे. सोमवार पेठेतील नरपतगिरी चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक वळवण्यात आली आहे. वाहनचालकांनी नरपतगिरी चौक, १५ ऑगस्ट चौक, कमला नेहरू रुग्णालय, पवळे चौक, कुंभारवेस मार्गे इच्छितस्थळी जावे.
वाहनं पार्क करण्याची व्यवस्था कुठे?
या भागात येणाऱ्या अनुयायांनी त्यांची वाहने एसएसपीएमएस प्रशालेचे मैदान (आरटीओ चौकाजवळ), पुणे स्टेशन परिसरातील तुकाराम शिंदे वाहनतळ, ससून कॉलनी येथे आपली वाहने पार्क करावीत.
ससून रुग्णालयात जाणाऱ्या वाहनांसाठी प्रवेश कुठून?
ससून रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णवाहिका, वाहनांसाठी शवागृहाजवळील प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात येणार आहे. मालधक्का चौक ते बोल्हाई चौक, बोल्हाई चौक ते साधू वासवानी चौक, बोल्हाई चौक ते जीपीओ, बोल्हाई चौक ते नरपतगिरी चौक, फोटो झिंको प्रेस उपरस्ता सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.
दांडेकर पूल परिसरात वाहतूक बदल
दांडेकर पूल परिसरातील वाहतूक बदल करण्यात येणार आहे. स्वारगेटकडून सिंहगड रस्त्याकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. स्वारगेटकडून सिंहगड रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी सारसबाग, कल्पना हॉटेल, ना. सी. फडके चौक, मांगीरबाबा चौक, जुना दत्तवाडी रस्ता, आशा हॉटेल चौकमार्गे सिंहगड रस्त्याकडे जावे. सिंहगड रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी आशा हॉटेल चौकमार्गे दत्तवाडीत यावे, तेथून इच्छितस्थळी जावे.
पीएमपीच्या मार्गातही बदल, बस नंबर जाहीर
या पार्श्वभूमीवर पीएमपीच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्थानक, ससून रोड आणि मोलेदिना बस स्थानक येथून सुटणाऱ्या बस पुणे स्टेशन आगार येथून सुटतील. तसेच परतीच्या वेळी बंडगार्डनकडून येताना वाडिया कॉलेज, अलंकार चौक व पुणे स्टेशन आगार असे संचलनात राहतील. दरम्यान हा बदल एका दिवसापुरता असून, प्रवाशांनी याची नोंद घ्यावी. पोलिस विभागाकडून येथील बदललेल्या मार्गानुसार पुढील मार्गावर पुणे स्टेशन येथून बस मार्गामध्ये बदल करण्यात आले ला आहे.
बस क्रमांक आणि मार्ग
२९,१४८, १४८ अ, २०१ : साधू वासवानी चौक, अलंकार चौकातून नेहमीप्रमाणे.
३, ५, ६, ३९, ५७, १४०, १४०अ, १४१ : पुणे स्टेशनकडे जाताना नरपतगीर चौकातून अथवा के. ई. एम. हॉस्पिटलजवळून उजवीकडे वळून एम्प्लॉयमेंट ऑफिस, लालदेऊळ व पुढे पुणे स्टेशन डेपो स्थानकामधून संचलनात राहतील.
२४, २४अ, ३१, २३५, २३६ : पुणे स्टेशनकडे जातेवेळेस नरपतगीर चौक अथवा के. ई. एम. हॉस्पिटल चौकातून रास्ता पेठ पाँवर हाऊस, एम्प्लॉयमेंट ऑफिस जवळून लाल देऊळ, पोलीस मुख्यालयातून नेहमीच्या मार्गाने जातील.
८, ८१, ९४, १०८, १४३, १४४, १४४, १४४क, २८३ : पुणे स्टेशनकडे जाताना नरपतगीर चौक अथवा के.ई.एम. हॉस्पिटल चौकातून एम्प्लॉयमेंट ऑफिस मार्गे लाल देऊळ, पोलिस मुख्यालय, सरळ पुढे पुणे स्टेशन डेपोतून वळवून जीपीओपासून सोडण्यात येतील
१४२, १४५, १४६ : पुणे स्टेशनकडे जाता-येता पेटिट इस्टेट स्थानकावरून सुटून जी.पी.ओ., लाल देऊळ, जिल्हा परिषद चौक, गाडीतळ मार्गे जातील.