Bhaskar Jadhav : महाराष्ट्राला गुजरातपेक्षा मोठे प्रकल्प देण्याएवढं मोठं मन मोदी-शाहांचं नाही, असं वक्तव्य ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केलं आहे. कुडाळ चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्याचा जबाब नोंदवण्यासाठी  पुण्यात आले असता त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. वेदांता फॉक्सकॉन, मरिन अकॅडमी, बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिवाईस पार्क, टाटा एअरबस यासारखे मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात आहे. त्यावरुन त्यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. 


वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेला मात्र मोदी-शाह यापेक्षा मोठा प्रकल्प राज्यात देणार आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. तो अजूनही कोणता होता हे जनतेला कळलं नाही. मात्र त्यानंतर चार प्रकल्प राज्याबाहेर गेलेत. तरीही मुख्यमंत्री अजून मोठे प्रकल्प महाराष्ट्रात येतील असं सांगत आहेत. गुजरातपेक्षा मोठे प्रकल्प महाराष्ट्राला देतील एवढं मोदी-शाहांचं मोठं मन नाही. मोठं मन असेल तर लहान प्रकल्प महाराष्ट्रात देण्याइतपत आहे, असा हल्लाबोल सरकारविरोधी केला आहे. 


आनंदाची शिधा वाटपावरुन टीका


पन्नास खोक्यांचं राजकारण काय आहे? हे संपूर्ण महाराष्ट्राला कळलं आहे. हे खोके आता मोठ्यांच्या तोंडापर्यंत गेले आहेत. मात्र सर्वसामान्यांना 100 रुपयांत दिवाळी करा असं सांगायचं आणि शिधा तुळशीच्या लग्नापर्यंत देतो म्हणून सांगायचं आणि जनतेची चेष्टा करावी, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. 


'विरोधक मारुन लोकशाही संपू शकत नाही'


विरोधी पक्ष हा देखील सत्ताधारी पक्षाला लोकशाहीमध्ये बरोबरीने आणि सक्षम असावा लागतो. मात्र वेगवेगळ्या माध्यमातून विरोधी पक्ष संपवून टाकायचा. त्यामुळे आपल्याचं लोकांना सुरक्षा पुरवायची असं सध्या सुरु आहे. राज्यकर्त्यांनी सगळ्यांना समान वागणूक द्यावी. आपल्यापेक्षा दुसऱ्याचा विचार करावा मात्र तसं न करता फक्त आपल्याच लोकांना सुरक्षा देत आहेत. यापूर्वीचे देखील अनेक उदाहरणं आपल्यापुढे आहेत. राज्याने जर सुरक्षा पुरवली नाही तर कंगना रानौत, किरीट सोमय्या यांना केंद्रातून सुरक्षा देण्यात आली होती. आता तर केंद्रात आणि राज्यात देखील त्यांचंच सरकार आहे. त्यामुळे ते कोणतीही सुरक्षा कोणालाही देऊ शकतात. मात्र विरोधक मारुन लोकशाही संपवू शकत नाही, असंही ते म्हणाले.


"जनतेचं लक्ष विचलित करण्याचं काम सध्या जोरात सुरु आहे"


शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ मागू नये आणि जनतेने दिवाळीची मदत मागू नये, मोठ-मोठे प्रकल्प परराज्यात जात आहेत. त्याबाबत लोकांनी आवाज उठवू नये म्हणून बच्चू कडू आणि रवी राणा यांना सरकारने समोर केलं आहे. दिवाळीमध्ये पूर्वी रेड्यांची झोंबी चालायची मात्र आता या दोघांची नुसराकुस्ती चालत आहे. जनतेचं लक्ष विचलित करण्याचं काम सध्या जोरात सुरु आहे, असा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे.