इंदापूर: इंदापुरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकरांच्या (Pradip Garatkar) विरोधाला डावलून  नगराध्यक्ष पदाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून भरत शहा यांना देण्यात आली आहे. काल (शनिवारी, ता १५) माजी उपनगराध्यक्ष भरत शहा (Bharat Shah) यांनी नगराध्यक्ष पदासाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. इंदापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (NCP Ajit Pawar) गटाकडून इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

Continues below advertisement


 NCP Ajit Pawar: भरत शहा यांच्या नावावरती शिक्कामोर्तब


काल (शनिवारी, ता १५)  भरत शहा यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पक्षाने जर आम्हाला कोलले तर आम्ही पक्षाला कोलू असा इशारा प्रदीप गारटकर यांनी पक्षाला दिला असताना देखील पक्षांना प्रदीप गारटकर यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे आता प्रदीप गारटकर स्थानिक आघाडी करून लढणार हे स्पष्ट झालेला आहे. तरीदेखील अधिकृतरित्या प्रदीप गारटकर त्यांची भूमिका सोमवारी मांडणार आहेत. दरम्यान  इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कोणाला उमेदवारी देणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागलं होतं. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून भरत शहा यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाले असून भरत शहा यांना इंदापूर नगर परिषदेची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष गारटकर याच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना अजित पवार गटात घेऊन नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यास अजित पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी मोठा विरोध दर्शवला होता. अशातही पक्षाने जिल्हाध्यक्ष गारटकर विरोधी भूमिका घेत भरत शहा यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. आज भरत शहा यांनी इंदापूर नगर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. त्यामुळे आता जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.


 NCP Ajit Pawar: जिल्हाध्यक्ष गारटकर राजीनामा देणार?


इंदापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण असून सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात असलेले इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात घेऊन नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यास पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आणि त्यांच्या समर्थकांचा प्रचंड विरोध आहे. नगराध्यक्ष पदाचा हा तिढा सोडवण्यासाठी पुण्यात अजित पवार, दत्तात्रय भरणे आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यात दोन दिवसापूर्वी बैठक पार पडली होती. मात्र या बैठकीत देखील जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या इच्छेप्रमाणे तोडगा निघाला नाही. त्यानंतर जिल्हाध्यक्ष गारटकर यांनी इंदापूर मध्ये त्यांच्या निवासस्थानी दाखल होत कार्यकर्त्यांची बैठक घेतली. बैठकीत जर पक्षाने गारटकर समर्थक विरोधी भूमिका घेतली तर मात्र आपल्या पदाचा राजीनामा देऊ आणि इंदापूर मध्ये स्थानिक आघाडी करून नगर परिषदेची निवडणूक लढवू असा पवित्रा गारटकर आणि त्यांच्या समर्थकांनी घेतला होता.


बैठकीवेळी बोलताना त्यांनी पक्षाने आमचं ऐकलं नाही तर नगराध्यक्ष पदाच्या मुद्द्यावरून गारटकर यांनी पक्षाला रामराम ठोकण्याची तयारी देखील दर्शवली होती. जर पक्षाने आपल्या विरोधी निर्णय घेतला तर स्थानिक आघाडी करून निवडणुकीच्या आखाड्यात उतरू, उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट बघू आणि राजीनामा देऊ. जर पक्षाने आमचं ऐकलं, योग्य सन्मान ठेवला तर आम्ही घड्याळावरती आहोत पक्षाने जर आम्हाला कोलल तर आम्ही सुद्धा पक्षाला कोलल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा गारटकरांनी अजित पवारांसह, दत्तात्रय भरणे यांना दिलेला होता. आता जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर कोणती भूमिका घेणार ? पक्षाला सोडचिट्टी देणार की अन्य मार्ग अवलंबणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.