बारामती : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार राजकारणात सक्रिय होण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत झालेल्या कार्यक्रमात पार्थ पवार यांनी उपस्थिती लावल्याने ही चर्चा रंगली आहे.


बारामतीमधील विविध कार्यक्रमात आजोबा शरद पवार यांच्यासोबत पार्थ पवार यांनी हजेरी लावत गाडीत एकत्रित सफर केली. दोन्ही कार्यक्रमात ते शरद पवार यांच्यासोबत होते. तर एका रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी शरद पवारांसोबत व्यासपीठावर त्यांच्या मागील रांगेत बसले होते.

मागील जिल्हापरिषद निवडणुकीपासून अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार राजकारणात सक्रीय झाले आहेत. रोहित पवार यांच्या जोडीला पार्थ पवार यांना राजकारणात आणून राष्ट्रवादी राज्यातील तरुणांचे मोठी संघटना निर्माण करण्याची करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पार्थ पवार यांचं आपले वडील अजित पवार यांच्यासारखंच बोलणं-चालणं असल्याने तरुणांमध्ये त्यांचं मोठं आकर्षण आहे. देशाच्या राजकारणात सक्रीय असलेले आणि ज्यांच्या राजकारणातील गणितांचा अजून कोणालाही उलगडा न झालेल्या अशा मुरब्बी राजकारण्याकडून म्हणजेच शरद पवारांकडून पार्थ धडे गिरवत आहेत.

त्यामुळे पवारांच्या तालमीत वाढणारा हा मल्ल हा राजकारणात कोणकोणते डाव खेळेल याकडे बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.