पुणे: अवघ्या 20 रुपयाच्या वादातून रिक्षाचालकाने केलेल्या मारहाणीत प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दुपारी पुण्यातील रविवार पेठेत ही धक्कादायक घटना घडली. तानाजी धोंडीराम कोरके असं मृत्यू झालेल्या प्रवाशाचं नाव आहे.
याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अतुल उर्फ ईश्वर हराळे आणि रोहन गोडसे अशी आरोपींची नावे आहेत.
तानाजी कोरके यांनी पुणे स्टेशनपासून रविवार पेठेकडे जाण्यासाठी अतुल उर्फ ईश्वर हराळेची रिक्षा ठरवली. तानाजी रविवार पेठ ते गणेश पेठ दरम्यान उतरले.
रिक्षा भाडं 40 रुपये झाले. तानाजींकडे देण्यासाठी वीसच रुपये होते. वीस नव्हते यातून वाद सुरू झाला. त्यावेळी आरोपीने साथीदाराच्या मदतीने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यात तो बेशुद्ध झाला. मात्र काही वेळांनी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला उपचाराला आरोपीच्याच रिक्षातून घेऊन गेले. उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचं ससूनच्या डॉक्टरांनी सांगितले. पण त्यावेळी पोलिसांना रिक्षावाल्याच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची माहिती नव्हती.
तानाजी मूळचा लातूरचा रहिवासी होता. गेली आठ वर्षे कामानिमित्त पुण्यात राहत होता.
पोलिसांनी संशयातून तपास सुरु केला आणि स्वतः ज्या रिक्षा चालकांनी रिक्षातून ससून हॉस्पिटलला घेऊन गेले, त्याच दोघांनी त्याचा खून केला होता, हे चौकशीत समोर आलं. जवळ असलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला.
आरोपी रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदाराला फरासखाना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.